भाजपने ‘बेटी भगाव’ कार्यक्रम सुरू केला का? उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माझ्या माता-भगिनींचा अपमान करणारे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नुसती कारवाई नाही तर या पुढे कोणात्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देता कामा नये, अशा खणखणीत शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्या प्रकरणी हल्ला चढवला. तसेच तुमच्यात असलेल्या धाडसाने अशी वक्तव्य करणाऱ्यांवर करावी, अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मुंबईतील रंगशारदा येथे सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राम कदम यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘मला असं वाटतं की हीन वृत्तीची माणसं मग ते परिचारक असतील, छिंदम असेल किंवा काल ज्यांनी तारे तोडले ते राम कदम असतील. माझ्या माता-भगिनींचा अपमान करणारे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये’, असंही ते म्हणाले.

‘कारण आपण राजकारण साफ करणार नसू, आणि आला त्या वाल्याचा आपण वाल्मिकी करणार असू तर वाल्मिकी ऋषींचा अपमान करत आहोत. कारण वाल्मिकी ऋषींचं एक स्थान आहे, त्यांची आणि यांची तुलना होऊ शकत नाही. आणि जर तुलना करणारे नितीन गडकरी मागे म्हणाले होते वाल्याचा वाल्मिकी करण्याची आमच्यात ताकद आहे, तर अशा नवं वाल्मिकींचं रामायण बघितलं तर भाजपने आता कार्यक्रम बदलायला पाहिजे, ‘बेटी भगाव’ असा नवा कार्यक्रम त्यांनी दिला आहे की काय मला माहीत नाही’, असा सवाल करत त्यांनी टोलाही लगावला.

तसेच, ‘जसा परिचारक देशद्रोही किंवा माझ्या जवानांच्या माता-भगिनींच्याबद्दल ते जे बोलले त्याच पद्धतीने राम कदम बोलले आहेत. म्हणून मला असं वाटतं की भाजपने, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभिर्यानं लक्ष देऊन, तात्काळ जी काही कारवाई ती तुमच्यात असलेल्या धाडसाने करावी’, अशी आमची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

हार्दिक पटेलने उपोषण मागे घ्यावे!

गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हा उपोषणासाठी बसला आहे. म्हणून मी त्याला फोन केला. उपोषणाने प्रश्न सुटणार नाही आणि तू लढवय्या आहेस. गुजरातला तुझी गरज आहे. तुझ्या न्याय मागण्यांसाठी शिवसेना कायम तुझ्यासोबत असेल, असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच गुजरात सरकारने देखील हार्दिक पटेलशी बोलणी करावी आणि त्याच्या मागण्या या न्याय असतील तर त्यावर निर्णय घ्यावा, असं ही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे:

  • महागाई आहेच, पण त्याचा विरोध आम्ही सत्तेत राहून करतच आहोत
  • रघुराम राजन हे चुकीचे होते मग त्यांना परत बोलवण्यासाठी प्रयत्न का सुरू आहेत?
  • नोटाबंदी बाबत आमची भूमिका कळण्यास त्यांना दोन वर्ष लागली
  • गांभिर्यानं लक्ष देऊन, मुख्यमंत्र्यांनी तुमच्यात असलेल्या धाडसाने कारवाई करावी
  • अशी विधानं करणाऱ्यांना कोणीही पक्षात घेऊ नये, कुणीही उमेदवारी देऊ नये
  • माता भगिनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
  • भाजपचा बेटी भगाव असा नवा कार्यक्रम आहे का?
  • विदर्भानंतर उर्वरित महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आज बोलवलो
  • मी सध्या राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना भेटलो
  • कोर्टाने सांगण्याच्या आधीच पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊ नये असं कोर्टानंही म्हटले आहे
  • गुजरात सरकारने हार्दिक पटेलसोबत चर्चा करावी
  • न्याय्य मागण्यांसाठी शिवसेना कायम हार्दिक पटेल सोबत आहे
  • हार्दिक पटेलला फोन केला, तू लढवय्या, गुजरातला तुझी गरज आहे