कर्जबाजारीपणामुळे गंगापूर तालुक्यात दोन तरुणांनी जीवन संपवले

गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील तरुणाने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील सचिन अशोक लिंगायत (33) याचे सिद्धनाथ वाडगाव येथे सलूनचे दुकान होते. आर्थिक कारणांमुळे त्याने 3 रोजी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्याला कुटुंबातील सदस्यांनी व गावातील तरुणांनी छत्रपती संभाजीनगर येथे घाटीत दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चक्री जुगारामुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लासूर स्टेशन येथील तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश ऊर्फ बाळू मोहन खंडागळे (42) 3 रोजी सकाळी शेतात कामाला जातो म्हणून घरून शेतात निघून गेले. मात्र संध्याकाळी घरी आले नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, शोध लागला नाही. तत्काळ शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रात्री 11.30 वाजता मिसींग दाखल करण्यात आली. नातेवाईकांनी लासूर स्टेशन परिसरातील अनंतपूर शिवारातील गट नंबर 158 त्यांच्या मालकीच्या शेतात शोध घेतला असता विहिरीजवळ चप्पल आढळून आली. शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. गणेश खंडागळे यांच्या पश्चात आजी, वडील, दोन भाऊ, भावजयी, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.