
तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा मंगळवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेत पूर्णपणे कोलमडली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा गोंधळ निर्माण झाला आणि चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. कामावरून घरी परतताना नोकरदारांची रेल्वे प्रवासात रखडपट्टी झाली. लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने चर्चगेट आणि विरार अशी दोन्ही दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनना जवळपास अर्ध्या तासाचा विलंब झाला, तर विरारहून चर्चगेटला लोकल ट्रेन 40 ते 45 मिनिटे उशिराने धावल्या. अंधेरी स्थानकाजवळ पॉइंट फेल्युअरची समस्या निर्माण झाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बोरिवलीहून चर्चगेटला जाणारी एक ट्रेन जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ उभी करून ठेवली होती. तांत्रिक बिघाडाबाबत रेल्वेने कोणतीही उद्घोषणा केली नाही. तसेच उशिराचे कारणही दिले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.