लोकलमध्ये चोऱया करणारा अटकेत

लोकलमध्ये महिलेचे दागिने चोरणाऱयाला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तारू शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात एकूण 20 गुन्हे दाखल आहेत.

तक्रारदार महिला या रे रोड परिसरात राहतात. सात दिवसांपूर्वी कांदिवली ते चर्चगेट असा प्रवास जनरल डब्यातून करत होत्या. लोकल दादरच्या फलाट क्रमांक दोनवर आली. तेव्हा तारूने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला. याप्रकरणी महिलेने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे 6 युनिटने सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक अरशुदिन शेख यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक शिंदे, अशोक होळकर, क्षीरसागर, साळुंखे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

एक लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना शेख दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. शेख हा कळव्याच्या शांती नगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे फिल्डिंग लावून शेखच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 1 लाख 5 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 20 गुन्हे दाखल आहेत.