दर दोन मिनिटांनी लोकल धावणार, सीबीटीसी प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा निर्णय

388

मध्य रेल्वेच्या फेर्‍यांमध्ये वाढ करणार्‍या एमयूटीपी -3 अ योजनेतील सीबीटीसीप्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे दर दोन मिनिटांनी लोकल धावणार असून एका तासात 15 ऐवजी 24 ते 25 लोकल धावणे शक्य होणार आहे. तसेच लोकल मार्गाची प्रवासी वाहतूक 30 टक्क्यांनी वाढणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर पारंपरिक सिग्नल यंत्रणेऐवजी मेट्रोप्रमाणे सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम)सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) घेतला आहे. सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आली असून 16 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. या यंत्रणेमुळे गर्दीच्या वेळेत सध्या एका तासात 15 लोकल धावतात त्याऐवजी 24 ते 25 लोकल चालवणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची लोकलची क्षमता तीस टक्क्यांनी वाढण्यास मदत मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीटीसीसारखी सिग्नल यंत्रणा उपनगरीय लोकलच्या फेर्‍या वाढविण्यासाठी गरजेची असून त्याचे अनेकदा एमआरव्हीसीकडून रेल्वे मंत्रालयासमोर सादरीकरण झाले व त्यात बदलही करण्यात आले, परंतु अंतिम निर्णय होत नव्हता.

सीबीटीसी म्हणजे काय

या यंत्रणेत सिग्नल यंत्रणा रेल्वेमार्गावर ठरावीक अंतरावर न राहता मोटरमनच्या कॅबमध्येच राहणार असून एका लोकलपासून दुसर्‍या लोकलला संदेश मिळाल्याने दोन लोकलमध्ये कमी अंतर राखणे शक्य होणार आहे. त्यामुळे लोकल फेर्‍यांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

सीबीटीसीचा फायदा

सध्या पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या पिकअवरला दर तीन मिनिटांना एक लोकल सुटते तर मध्य रेल्वेवर दर चार मिनिटांनी एक लोकल सुटते. हीच वेळ सीबीटीसीमुळे दोन ते अडीच मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

प्रकल्पाचा खर्च कोटींत

सीएसएमटी ते कल्याण – 2,166

सीएसएमटी ते पनवेल – 1,391

चर्चगेट ते विरार      – 2,371

आपली प्रतिक्रिया द्या