
कोरोनाच्या महामारीत सुरु असलेल्या लॉकडाउनचा पर्यावरणावर मात्र सकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदूषण करणारे कारखाने आणि उद्योग सुमारे सव्वा महिने बंद राहिल्याने देशातील प्रमुख नद्यांनीही आता मोकळा श्वास घेतला आहे. गंगा, यमुना, नर्मदा या पवित्र व प्रमुख नद्यांचे पाणी आता शुद्ध आणि पिण्यायोग्य झाल्याचा निर्वाळा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.
मध्यप्रदेशातील नर्मदा नदीचे पात्र तर 25 वर्षानंतर प्रथमच काचेसारखे नितळ झाले असून पाणीही मिनरल वॉटरच्या दर्जाचे झाले असल्याचे दिसून आले आहे. एकूण ही परिस्थिती पाहता गंगा तेरा पानी अमृत, झरझर बहेता जाये, ही बॉलिवूडच्या गाण्यातील ओळ प्रत्यक्षात उतरली आहे.
भगवान ओंकारेश्वरांचे पवित्र देवस्थान वसलेल्या नगरीतून पवित्र नर्मदा नदी वाहते. हिंदू धर्मियांत नर्मदा परिक्रमेला अतिशय पवित्र मानले जाते. अशी ही नर्मदा शहरांतील कारखाने आणि उद्योगांनी सोडलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे आणि स्थानिक नागरिक व तीर्थ यात्रींच्या स्नानसंध्यामुळे गेली अनेक वर्षे प्रदूषित झाली होती. खरे पाहता नदी ज्या परिसरातून वाहते त्या डोंगरदऱ्यांतील औषधी वनस्पतीच्या संपर्काने नर्मदेचे पाणी हे औषधी झाले होते. त्यामुळे या पाण्याने स्नान करणे यात्रेकरूंसाठी अतिशय उपयोगी ठरत होते. मात्र औद्यगिकरणाने गंगा, यमुना या पवित्र नद्यांप्रमाणे नर्मदाही वर्षानुवर्षे प्रदूषित झाली होती. महिनाभर प्रदूषणाचा मारा थांबल्याने नर्मदेचे पात्र पुन्हा पूर्वीसारखे शुद्ध झाले आहे. इतके की तिच्या पाण्याचा दर्जा मिनरल वॉटरसारखा दर्जेदार झाल्याची माहिती नर्मदा प्रदूषण नियंत्रण बोर्ड ओंकारेश्वरचे (मप्र) व्यवस्थापक एस.के व्यास यांनी दिली आहे.
इतके शुद्ध झाले नर्मदेचे पाणी
हिंदू धर्मियांत अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नर्मदेचे पाणि लॉकडाउनच्या काळात 25 वर्षांच्या काळानंतर अतिशय शुद्ध झाले आहे. नर्मदेच्या पाण्याची शुद्धता प्रति लिटर 99 टीडीएस इतकी झाली आहे. जी काही दिवसांपूर्वी प्रति लिटर 126 टीडीएस इतकी होती. पात्रातील प्रदूषण पूर्ण थांबल्याने नदीच्या पाण्याची घनताही 10 एनटीयूपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळेच नदीचे पात्र अगदी काचेसारखे नितळ झाल्याचा दावा ओंकारेश्वरच्या जल अभियंत्यांनी केला आहे. नदीच्या पाण्याची पारदर्शकता वाढल्याने नदीच्या पात्रात 10 फूट खोलीवर असलेले नर्मदेचे गोटेही (दगड) स्पष्ट पाहता येत आहेत.
























































