
जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा धसका हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांनीही घेतला असून देशात सुरू असलेला लॉकडाऊन संपल्यानंतरही ऑफिसला जायला भीती वाटत असल्याची कबुली त्यांनी एका सर्वेक्षणात दिली आहे. देशातील 93 टक्के कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन उठवल्यानंतरही ऑफिसला जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. तर 85 टक्के कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालय सुरू होण्याआधी ते पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे असे मत व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. मात्र, आता हळूहळू या लॉकडाउनचे नियम शिथिल करत जनजीवन सर्वसामान्य करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनानंतरचे जग हे आधीसारखे नसेल असे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे. खास करुन कॉर्पोरेट ऑफिसमधील वातावरण हे पूर्णपणे वेगळं असण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘एफवायआय’ या आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनीने ‘माइंड मॅप अॅडव्हान्स रिसर्च’ या कंपनीकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरुमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मते एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली. हिंदुस्थानातील 560 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 85 टक्के कर्मचारी पुरुष होते तर 15 टक्के महिला कर्मचारी होत्या. एफव्हाआय कंपनीने एप्रिल 2020 मध्ये हे सर्वेक्षण केले होते.
“खरंतर कोरोनाच्या साथीमुळे कामाकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदी साध्यासाध्या गोष्टींबद्दलही बदलला आहे. हिंदुस्थानमधील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी नव्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल, असे चित्र सध्या आमच्या सर्वेक्षणामधून समोर येत आहे.”
– ईशान गोयल, प्रमुख कार्यकारी अधिकारी, एफवायआय
























































