
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जवळपास तीन महिने या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरातूनच आपलं काम करत आहेत. या दरम्यान पुरुषांमध्ये नपुंसकता वाढत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सुपर ड्रग ऑनलाईन डॉक्टर नावाच्या औषधे आणि उपचार पुरवणाऱ्या संकेतस्थळाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच गुगलनेही त्याच्याकडे आलेल्या सर्चिंग अहवालाच्या आधारे हे निरीक्षण नोंदवलं आहे. लॉकडाऊनमध्ये पुरुषांच्या नपुंसकतेत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुगलवरही गेल्या तीन महिन्यांत नपुंसकतेवरचे उपाय, कारणं आणि तत्सम माहिती सर्वाधिक सर्च केले गेले आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ताण, थकवा, अस्वस्थता, धूम्रपान आणि मद्यपान अशा कारणांमुळे ही समस्या वाढू शकते. गेल्या तीन महिन्यांत घरात थांबलेल्या अनेकांनी यापैकी काही गोष्टींचा किंवा सर्वच गोष्टींचा सामना केला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्या आहेत. यावर निश्चित औषध असलं तरी ते वैद्यकीय चाचण्यांशिवाय घेऊ नये, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नपुंसकतेला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कमी करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. धूम्रपान आणि मद्यपान बंद करणं, सकस आहार घेणं, ताणतणावासून दूर राहणं, व्यायाम, पुरेशी झोप या सर्वांच्या मदतीने फक्त नपुंसकताच नाही तर आरोग्याच्या अन्य तक्रारीही दूर करता येतील, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.


























































