लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या बायकोला भेटायला आला, गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

2087

कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांची लग्नंही पुढे ढकलली आहेत. अशाच एका लग्न पुढे ढकलल्यामुळे वैतागलेल्या लग्नाळू तरुणाला मात्र लॉकडाऊनने फायदा झाला आहे.

बिहारमधील सूरतपूर येथे राहणाऱ्या सौरभ प्रकाश याचा विवाह गौरा ओपी येथे राहणाऱ्या आरती राय या तरुणीशी ठरला होता. एप्रिल महिन्यातल्या मुहूर्तावर दोघांचं लग्न ठरवण्यात आलं होतं. पण, मध्येच कोरोनाचा अडथळा आला आणि लॉकडाऊन झालं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने नवीन तारीख काढण्यासही कुटुंबीयांना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वैतागलेला सौरभ वरचेवर आरतीला भेटायला तिच्या गावात जाऊ लागला. शनिवारी देखील तो गावात तिला भेटायला गेला होता. मात्र, त्यांना भेटताना पाहिल्यावर ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला. त्यावर त्याने आपलं लग्न ठरल्याचं आणि ते पुढे ढकलल्याचं सांगितलं. गावकरी मंडळींनी दोन्ही कुटुंबांना बोलवून घेतलं आणि लग्न लावण्यास सांगितलं.

इतक्यावर बोलून गावकरी थांबले नाहीत, तर मंदिरात लग्नाची तयारीही करण्यात आली. कोणत्याही धामधुमीशिवाय अगदी साधेपणाने या दोघांचं लग्न गावकऱ्यांनी लावून दिलं.

आपली प्रतिक्रिया द्या