चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

474

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून ब्रह्मपुरी शहरात तीन दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. ही उपाययोजना आरोग्य रक्षणासाठी करण्यात आली असून, कोरोना साखळी तोडणाऱ्या या उपाययोजनेला सहकार्य करण्याचे प्रशासनाने केले आहे.

तीन दिवसांच्या या काळामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली गेली आहेत. या कालावधीत केवळ सरकारी कार्यालय, सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरू आहेत. वैद्यकीय सेवेकरिता आवश्यक वाहतूक सेवे व्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक सेवा बंद आहे. त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, पूर्णता बंद आहेत. या कालावधीत शासकीय कर्मचारी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर सामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

एकट्या ब्रह्मपुरी शहरामध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ग्रामीण भागामध्ये 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यातच शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी काही दिवसापूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे शहराच्या अन्य भागातही संसर्ग झाला अथवा नाही हे तपासण्यासाठी शहर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पुढे आले आहे. त्यातूनच ब्रह्मपुरी शहर तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या