लॉकडाऊन झुगारून वारकरी पंढरीत दाखल, वीसहून अधिक भाविकांना घेतले ताब्यात

1590

निर्जला एकदशीचे औचित्य साधून वारी पोहोचती करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून वारकरी मोठ्या संख्येने मंगळवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले. या वारकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून लॉकडाऊन असताना हे भाविक पंढरपूरात आले कसे यावर चिंता व्यक्त होत आहे.

धार्मिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी त्याचे अधिकार राज्य शासनाकडे दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 30 जून पर्यत मंदिर न उघडण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. तथापि मंगळवारी निर्जला एकादशीचे निमित्त साधून वारकरी भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले दिसून आले. अनेकांनी चंद्रभागेचे स्नान करुन नगरप्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेतले.

हा सगळा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वीसहून अधिक वारकऱ्यांना रोखून प्रशासनाला कळविण्यात आले. हे सगळे भाविक लातूर, सातारा, कोल्हापूर, नगर, बीड, उस्मानाबाद आदी भागातील आहेत. मोटर सायकल आणि खाजगी वाहनातून आल्याचे त्याने सांगितले. लॉकडाऊनचा नियम मोडून आलेल्या या भाविकांबाबत काय कारवाई करायची याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या