जागतिक सिनेमा बघतेय, स्पॅनिश शिकतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उषा जाधव, अभिनेत्री

दोन ते तीन महिने आपण घरात निवांत कधीच बसत नाही. लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांवर ही वेळ आली. या काळात घरात बसून राहणे हेदेखील चॅलेंजिंग होते. त्यामुळे शारीरिक फिटनेससाठी मी योगा केला आणि मनःशांतीसाठी मेडिटेशनचा मार्ग निवडला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी टीव्हीवरच्या बातम्या केवळ माहितीपुरत्याच पहिल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून मला स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय आहे. जेवण बनवणे, घरकाम करणे हे माझ्यासाठी काही नवीन नाही. लॉकडाऊनच्या सुट्टीत मी केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जागतिक सिनेमांचा अभ्यास. मला वेगवेगळ्या भाषेतील सिनेमे बघायला खूप आवडतात. एरव्ही आठवडय़ातून एक किंवा दोन सिनेमेच बघायला मिळायचे. मोकळ्या वेळेत मी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सिनेमे, शोज पाहिले. त्यामुळे जगभरात काय सुरू आहे, कलाकार कशा पद्धतीने काम करतायत याचा अंदाज आला. भविष्यात कलाकार म्हणून या गोष्टीचा नक्कीच मला उपयोग होईल.

मी एका स्पॅनिश सिनेमात काम केले आहे. भविष्यात आणखी एका स्पॅनिश सिनेमावर काम सुरू आहे. त्यासाठी मी स्पॅनिश शिकतेय. मधल्या काळात ते काहीसे मागे पडले होते. पण लॉकडाऊनमध्ये मी बऱयापैकी स्पॅनिश शिकले. एकंदरीत कलाकार म्हणून माझेदेखील वर्क फ्रॉम होम सुरू होते. या दरम्यान व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर स्वतःसाठी विचार करायला खूप वेळ मिळाला. आपण काय करतोय, भविष्यात काय केले पाहिजे यादृष्टीने प्लॅनिंग केले.

आज संपूर्ण जगाचा कोरोना हा एकच शत्रू आहे. हा शत्रू कायमचा हद्दपार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने जगाला एकत्र आणले आहे असे मला वाटते. सध्या अनलॉक 1 फेज सुरू झाली असली तरी अजूनही लोकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. कोरोनावर औषध नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टंन्सिंग राखा हाच त्यावर सध्या उपाय आहे. शेवटी एवढेच सांगेन की, कोरोनाचे संकट कायम आपल्यासोबत राहणार नाही. एक ना एक दिवस आपण नक्कीच त्यातून मार्ग काढू. फक्त संकटाशी धैर्याने लढा, खचून जाऊ नका!