
दिवाळी आणि बिग बजेट चित्रपट हे बॉलिवूडचे गेल्या अनेक वर्षांपासून समीकरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज न झाल्याने बॉलीवूडचे तब्बल 200 ते 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बॉक्स ऑफीसवर खडखडाट पाहायला मिळतोय. कोरोनामुळे यावर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बॉलीवूडने कंबर कसली असून पुढच्या वर्षी अनेक बिग बजेट चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
कोरोनामुळे बंद असलेली थिएटर तब्बल आठ महिन्यांनी पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. अजूनही काही राज्यांत थिएटर बंद आहेत त्यातच 50 टक्के प्रेक्षकांच्या अटीमुळे सध्यातरी निर्माते आपला चित्रपट रिलीज करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे सध्या जुने गाजलेले चित्रपट थिएटरमध्ये झळकत आहेत. दरवर्षी दिवाळीला शाहरुख, सलमान किंवा अक्षयचे चित्रपट रिलीज होतात. जे साधारण 200 ते 300 कोटी रुपयांची देशात कमाई करतात. यंदा मात्र दिवाळीत दिलजीत दोसांज, मनोज वाजपेयी यांचा ’सूरज पे मंगल भारी’ हा एकमेव चित्रपट रिलीज होऊनही प्रेक्षकांची पावले थिएटरकडे वळली नाहीत.
याबाबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श म्हणाले, ‘सूरज पे मंगल भारी’ला चांगली ओपनिंग मिळाली नसली तरी निर्मात्यांनी नवीन चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याचे धाडस दाखवलेय ही नक्कीच समाधानकारक बाब आहे. सूर्यवंशी, 83 सारखे बिग बजेट चित्रपट रिलीज होत नाहीत तोपर्यंत तरी थिएटर व्यवसाय पूर्ववत होणार नाही.
नुकसान भरून काढणार
कोरोनामुळे यावर्षी बॉलीवूड दोन पाऊल मागे गेले तरी पुढच्या वर्षी मात्र मोठी झेप घेणार आहे. अक्षयचा सूर्यवंशी, बेलबॉटम, रक्षाबंधन, बच्चन पांडे, अजय देवगणचा मैदान, कभी ईद कभी दिवाली, सलमानचा राधे, आमीरचा लाल सिंग चढ्ढा, रणवीर सिंगचा 83, सर्कस, शाहरुखचा पठाण, बिग बी यांचा ब्रम्हास्त्र्ा, झुंड, वरुण धवनचा मि. लेले, जॉनचा सत्यमेव जयते 2 आदी चित्रपट बॉलीवूडचे यावर्षी झालेले नुकसान भरून काढत बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडतील अशी आशा आहे.
डिसेंबरकडून आशा
संदीप और पिंकी फरार, बंटी और बबली 2, हॉलिवूडचा टेनेट हे चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. ख्रिसमस विकेंडलादेखील एखादा बिग बजेट चित्रपट रिलीज होऊ शकतो अशी आशा थिएटर मालकांना आहे.
























































