प्रशांत दामले करणार पुनश्च हरिओम! डिसेंबरमध्ये ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे पुण्यात प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल आठ-नऊ महिन्यांच्या मोठय़ा ब्रेकनंतर नाटय़गृहाचा पडदा उघडणार आहे. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत नाटय़गृहे उघडण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा तिसरी घंटा कधी वाजणार याची प्रतीक्षा प्रेक्षक आणि नाटय़कर्मींना होतीच. अखेर याची नांदी पुण्यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट ’ या नाटकाने होणार आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबरला पुण्यात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांनी ही आनंदाची बातमी नाटय़रसिकांना आज दिली.

प्रशांत दामले यांनी बुधवारी फेसबुक पोस्ट करत ‘नाटक अनलॉक, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ 12 आणि डिसेंबरला पुणे येथे पुनश्च हरिओम’ असं म्हटलंय. तसं बघितलं तर गेल्या दोन दिवसांपासून दामले यांच्या एका फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामध्ये त्यांनी ‘लवकरच एक मत्त बातमी मी देणार’, असं लिहिलं होतं. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली होती. नेमकी काय बातमी असणार याचा अंदाज नेटकरी बांधत होते. ती बातमी कोणती याचा खुलासा आज त्यांनी केला, असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी दामले यांनी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, साठे सभागृह या तिन्ही नाटय़गृहांची स्वच्छता मोहीम जोरात सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचे काही व्हिडीओदेखील शेअर केले होते.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’या नाटकामध्ये प्रशांत दामले, कविता लाड, अतुल तोडणकर यांच्या भूमिका आहेत.