कासारटाका येथील धार्मिक कार्यक्रमांना बंदी; तहसीलदार अजय पाटणे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी पर्यटन व मौजमस्ती साठी प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील धामापूर कासारटाका येथील धार्मिक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून सुरू होणार्‍या धामापूरातील दोन्ही कासारटाका या ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश पत्र तहसीलदार अजय पाटणे यांनी धामापूर ग्रामपंचायत सरपंच-ग्रामसेवक व पोलिस निरीक्षक मालवण यांना दिले आहेत.

देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा संसर्ग आहे. शासनाच्या आदेशानुसार धार्मिक कार्यक्रम व त्यासाठी एकत्रित येण्यास व कार्यक्रम करण्यास प्रतिबंध केला आहे, असे असताना दरवर्षी जून महिन्यापासून धामापूर येथील कासारटाका या धार्मिक स्थळी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्याठिकाणी एकत्रीत येऊन जेवणाचा कार्यक्रम केला जातो. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुढील आदेश होईपर्यत राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे.

धामापूरच्या दोन्ही कासारटाक्याच्या ठिकाणी कोराना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रम सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात होणार नाहीत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कासारटाका याठिकाणी वेळोवेळी खातरजमा करावी, असे आदेश तहसीलदार पाटणे यांनी दिले आहेत.