मुंबईतील परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, भाविकांना दिलासा; मूळ गावी जाण्यासाठी खासगी दवाखान्यातही मिळणार प्रमाणपत्र

1173

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मुंबईतील परप्रांतीय मजूर, भाविक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी आता पालिका दवाखाने, मेडिकल कॉलेज, पालिका रुग्णालये, खासगी नर्सिंग होम आणि दवाखान्यातही ‘फिट’ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे लाखो मजूर, भाविक आणि विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून पालिका कार्यालये आणि पोलीस ठाण्याबाहेर होणारी गर्दी कमी होणार आहे. मात्र, हे प्रमाणपत्र ठराविक वेळेतच उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, पुणेमधील लॉकडाऊन कायम ठेवले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना या शहराबाहेर जाता येणार नाही. मात्र, मुंबईत अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर, भाविक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना शारिरीकदृष्ट्या फिट (निरोगी) असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी काल पालिका कार्यालये आणि पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवत मुंबईत अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. अशी गर्दी झाली तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आज पालिका दवाखाने, रुग्णालये, मेडिकल कॉलेज आणि खासगी दवाखान्यांनाही फिटनेस प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली आहे.

प्रमाणपत्रात काय असेल

प्रमाणपत्रात मूळ गावी जाणाऱ्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असेल. पालिका दवाखान्यात दुपारी 2 ते 4 या वेळेत हे प्रमाणपत्र मिळणार आहे. तर खासगी नर्सिंग होम, दवाखाने, पालिका रुग्णालये, मेडिकल कॉलेज यांनी त्यांना योग्य वाटेल, ती वेळ निश्चित करावी, असे निर्देश मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पदमजा केसकर यांनी दिले आहेत.

सरकारी ओळखपत्र आवश्यक

तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे सरकारी ओळखपत्र जसे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या ओळखपत्राची फोटोकॉपी तपासणीनंतर डॉक्टरकडे जमा करावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या