विमानप्रवाशांना तिकीटांचा परतावा मिळणार! मुंबई ग्राहक पंचायतीची संयुक्त राष्ट्र संघाने घेतली दखल

846

कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरातील विमान सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी बुक केलेल्या तिकीटांचा रिफंड मिळणे दुरापास्त झाले होते. यात विमान कंपन्यांनाही प्रचंड तोटा झाल्याने त्यांनी ग्राहकांना तिकीटांचा रिफंड परत न करता नवनव्या स्किम ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केले होते. याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने दिलेल्या लढ्याला यश आले असून संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई ग्राहक पंचायतीच्या पिटीशनची दखल घेत युनोचे सदस्य असलेल्या राष्ट्रांना ग्राहकांचे हित जपण्याची सूचना केली आहे.

लॉकडाऊनमुळे जागतिकस्तरावर 45 लाख हवाई उड्डाणे रद्द करावी लागली. सहाजिकच ज्या प्रवाशांनी आपली विमान तिकीटे आगाऊ विकत घेतली होती, त्यांनी विमाने रद्द झाल्याने आपआपले पैसे मागण्याचे सुरूवात केली. विमान सेवा महिना दोन महिने रद्द झाल्याने विमान कंपन्याही कंगाल झाल्या. त्यामुळे त्यांनीही आपल्या ग्राहकांना पैसे परत न देता त्यांचे पैसे सेफमध्ये ठेवून देऊ असे सांगितले. तसेच वर्षभरात ते पैसे कधी वापरता येतील असे भासविले. वर्षभरात केव्हाही प्रवास करा असे सांगताना त्या पैसातूनही कंपन्यांनी पैसे कापले. त्यामुळे प्रवाशांनी संतापून मुंबई ग्राहक पंचायतीकडे तक्रारी केल्या.

या संदर्भात माहिती देताना शिरिष देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही जागतिक माहिती घेतली असताना जगभरातील विमान कंपन्या ग्राहकांना तब्बल 3500 कोटी डॉलर्स इतकी मोठा तिकीट परतावा देऊ लागत होत्या. त्यामुळे आणि जगभरात विमान प्रवाशांनी तेथील पातळीवर तक्रारी दाखल केल्या आहे. या प्रश्नाचे जागतिक स्वरूप पाहून संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत सदस्य देशांना ‘युएन गाईडस् लाइन फॉर कंझ्युमर प्रोटेक्शन’ अंतर्गत सूचना दिल्या आहेत.

युनोचे सदस्य देशांना अशा प्रकारे ग्राहकांना कंपन्यांनी ‘क्रेटिड शेल’ची सक्ती करू नये. प्रवाशांचा परताव्याचा अधिकार मान्य करीत रिफंड द्यावेत अशी सूचना ‘युएनसीटीएडी’ कडे केल्याचेही कार्याध्यक्ष शिरिष देशपांडे यांनी सांगितले. तसेच क्रेडिट शेलमध्ये पैसे ठेवून भविष्यात त्या बदल्यात नवी तिकीटे घेण्याची योजना अधिक आकर्षक व दीर्घ मुदतीची करावी तसेच त्यांची प्रवाशांवर सक्ती न करता त्यांच्या स्वच्छेनुसार ती अमलात आणावी अशी सूचना ग्राहक पंचायतीने केली होती. ही मागणी कंझ्युमर्स इंटरनॅशनलकडे सुद्धा लावून धरली होती.

युनोने केला ग्राहक पंचायतीचा उल्लेख

मुंबई ग्राहक पंचायतीने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. याची परिणीती म्हणजे युनोने 4 जूनला दिलेल्या आदेशात सदस्य देशांना आदेश देताना विमान कंपन्यांनी क्रेडिट व्हाऊचर्सची सक्ती न करता ग्राहकांना रिफंड देण्याचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सूचना पत्रात ‘एमजीपी इंडिया’ने अशी मागणी केल्याचा स्पष्ट उल्लेख केल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष देशपांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या