नागरिकांनो घराबाहेर पडू नका; पुण्यात लॉकडाउन पुन्हा सुरु

992

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

या काळात अत्यावश्यक सेवेतील दूध, औषधे, दवाखाने सुरू राहणार असून, उर्वरित सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरून संचार, पदपथावरून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यात कोरोनाचा प्कोप वाढला असून, दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहन जप्तीची होणार कारवाई
लॉकडाउनची कडक अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. त्याशिवाय विनामास्क प्रवास, मोटारीसह दुचाकीवर जास्त नागरिकांनी प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय वाहतूक कर्मचाऱ्यांनाही सूचीत करण्यात आले आहे.

लॉकडाउन कालावधीत नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. कारणांशिवाय प्रवास करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे.
बच्चन सिंह, पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

आपली प्रतिक्रिया द्या