पश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक दोन शिफ्टमध्ये केले

western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

उपनगरीय मार्गांवरील लोकलमधील वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. पश्चिम रेल्वेने या उपक्रमाची सुरूवात स्वतःच्याच कर्मचाऱ्यांपासून करीत त्यांना सोमवारपासून दोन शिफ्टमध्ये कामावर येण्यास सांगितले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे कर्मचाऱयांच्या आता स.8 आणि दु. 2 अशा दोन शिफ्ट असणार आहेत. रेल्वेचे कर्मचारी केवळ 22 हजार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर पाच लाख अत्यावश्यक कर्मचारी विशेष फेऱ्यांद्वारे प्रवास करीत आहेत. त्यामुळे सरकारी आणि खाजगी अशा सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलल्यासच खरी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

उपनगरीय लोकलची पिकअवरमधील गर्दी कमी करण्यासाठी कामगारांच्या विविध शिफ्ट करण्याची मागणी गेली अनेक वर्षे राज्य सरकारकडे लावून धरली आहे. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्य सरकार आणि इतर कर्मचाऱयांच्या कामाच्या वेळा बदला अशी मागणी केली होती. आता कोरोना काळात तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी कामाच्या वेळा बदलल्या तर लोकलमध्ये जास्त गर्दी होणार नसल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम रेल्वे कामगारांच्या वेळा बदलणारी पहिली सरकारी संघटना ठरली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये सुमारे 22 हजार कर्मचारी असून त्याचे कामाच्या पाळ्या आजपासूनच बदलण्यात आल्या आहेत. विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या माहितीनूसार कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये काम करतील. पहिली पाळी स. 8 ते द. 2 वाजेपर्यंत अशी असेल तर दुसरी पाळी दु. 2 ते सायं. 8 वाजेपर्यंत असणार आहे.

पश्चिम रेल्वेने उघडली सांताक्रुझ, विरार येथे कार्यालये

पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ आणि विरार येथे नवीन कार्यालये उघडली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी चार ठिकाणी नवीन ऑफिस उघडण्यात येतील. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये मुंबई सेंट्रल येथे काम करणाऱया स्टाफला मुंबई सेंट्रलपर्यंत प्रवास करण्याऐवजी नजिकच्या कार्यालयात काम करता येईल असे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या