
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदार संघ आणि लातूर लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ येतो. या सर्व मतदारसंघातील 25 लक्ष 2 हजार 244 मतदार आणि त्यांच्यासाठी 2955 मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आजपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सामनाशी बोलताना सांगितले. या तिन्ही ठिकाणी 18 एप्रिल ला मतदान होणार आहे.
Lok sabha 2019 महाराष्ट्रात कोणत्या मतदार संघात कधी होणार मतदान, वाचा सविस्तर…
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व तयारी सुरु करण्यात आली असून, वेगवेगळ्या मतदान केंद्रासंदर्भात व एवूâण मतदार संख्येसंदर्भात पडताळणी करण्यात आली आहे. मतदारांची नावे वगळणी व या महिन्यात झालेल्या नविन मतदारांची आकडेवारी येत्या दोन दिवसात उपलब्ध होईल. आजमितीला नांदेड जिल्ह्यात नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन लोकसभा मतदारसंघासाठी 2 लाख 50 हजार 244 मतदार नोंदविण्यात आले आहेत. नव्याने आलेली नोंदणी आणि वगळणी हा आकडा साधारणतः पाच हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, अंतिम आकडेवारी येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जाहीर करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा नांदेड लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी याठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघाची मिळून 17 लाख 991 मतदार हे नोंदविल्या गेले आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट आणि हदगाव ही दोन मतदारसंघ येतात. तेथे 5 लक्ष 31 हजार 116 मतदार आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. तेथे 2 लाख 70 हजार 137 मतदार आहेत. नांदेड लोकसभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातूनच प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येणार असली तरी मतपत्रिका या तेथील मतदारसंघानुसार मतदान यंत्रावर येणार आहेत.
Lok sabha 2019 महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या वाढली
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 1996 मतदान केंद्रे तर हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 647 तर लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 312 मतदान केंद्रे असणार आहेत. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ही नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 58, हिंगोलीसाठी 9 आणि लातूरसाठी 3 मतदार आहेत. मतदान यंत्रावर नन ऑफ द अबोह अर्थात यापैकी कोणी नाही यासाठीही मतदानाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी गेल्या तीन महिन्यात जनजागृती अभियान राबविण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली. यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेची आचारसंहिता रविवारपासून लागू होणार असल्याने या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी, जि.प.पदाधिकारी, महापालिका यांच्याकडे असलेली वाहने जमा करण्याचे काम आज रात्रीपासूनच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत महत्वाची असून, त्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर व त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत यासाठी वेगवेगळी पथके निर्माण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

























































