
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतला मध्यवर्ती मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणारा दक्षिण-मध्य मुंबई हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे 21 नगसेवक तर सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. पण या मतदारसंघाचे एक वैशिष्टय़ आहे. प्रत्येक वेळेस मतदारांनी एकाच खासदाराला दुसऱयांदा निवडून दिले नाही हा इतिहास आहे. पण यंदा शिवसेना-भाजपचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हा प्रघात मोडतात का? याविषयी सर्वत्र औत्सुक्य आहे.
2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर आहे. या भागात शिवसेनेचे 17 नगरसेवक आहेत. तर भाजपचे सात नगरसेवक आहे. या सर्व नगरसेवकांची कामे व खासदार म्हणून राहुल शेवाळे यांनी केलेल्या कामांच्या जोरावर शिवसेना दक्षिण-मध्य मुंबईत पुन्हा बाजी मारेल असे चित्र आहे.
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. दादर-माहीममध्ये उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित मतदार तर धारावीत हातावर पोट असलेला कष्टकरी मतदार आहे. चेंबूर- अणुशक्तीनगरमध्ये आरपीआयचे प्राबल्य आहे. या भागातील रिपाइंची मते शिवसेनेच्या पारडय़ात पडतील. नगरसेवक म्हणून राहुल शेवाळे यांनी अणुशक्तीनगरमध्ये कामाचा प्रभाव दाखवून दिला आहे.
नाराजीचा फायदा शिवसेनेला!
या मतदारसंघातील धारावी व दादर-माहीम येथील काँग्रेसमधील नाराजीचा फायदा शिवसेनेला मिळणार आहे. धारावीत घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून विद्यमान आमदार वर्षा गायकवाड व त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकाच कुटुंबाला सर्व राजकीय फायदे कशाला, असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
दादरमध्येही काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आहे. एकनाथ गायकवाड यांच्या उमेदवारीला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उघडपणे विरोध केला आहे. त्यातच एकनाथ गायकवाड (82) यांच्या वयाचा विचार करता त्यांना उमेदवारी नको अशी मागणी काँग्रेसमधीलच एका ज्येष्ठ नेत्याने दिल्लीदरबारी केली. चेंबूर-अणुशक्तीनगरमधील गुरुदास कामत यांची लॉबी एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात आहे. या सर्व नाराजीचा काँग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसणार आहे.
मनसेची मते शिवसेनेकडे
2014 मधील लोकसभा निवडणुकीत मनसेचे आदित्य शिरोडकर निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी मनसेला 72 हजार मते मिळाली होती. मनसेचा उमेदवार यंदा रिंगणात नसल्याने ही मते शिवसेनेच्या पारडय़ात पडण्याची शक्यता आहे. मनसेच्या मतदारांना काँग्रेसपेक्षा शिवसेना जवळची आहे. त्यामुळे मनसेचे मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही. ही मते शिवसेनेकडे वळतील. त्यामुळे शिवसेनेची आघाडी वाढेल असे राजकीय विश्लेषक सांगतात.
शीख समाज शिवसेनेसोबत
शीव-कोळीवाडय़ात शीख समाज मोठय़ा संख्येने आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शीख समाजाच्या मनात आदर आहे. शीख समाज नेहमी शिवसेनेसोबत राहिला आहे. शिवसेना-भाजप युतीचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेचा पारडे जड आहे. त्याशिवाय शीव, वडाळा, जीटीबी व इतर रेल्वे स्थानकांचा कायापालट व सीजीएस कॉलनीचा एनबीसीसीमार्फत विकास व सीजीएस कॉलनीत गॅस पाइपलाइनच्या जोडणीचे काम केले असल्यामुळे मतदारांचा कल शिवसेनेकडे आहे.
राहुल शेवाळे – शिवसेना – 3 लाख 81 हजार 008
एकनाथ गायकवाड – काँग्रेस – 2 लाख 42 हजार 828
आदित्य शिरोडकर – मनसे – 73 हजार 096
सुंदर बालाकृष्णन – आप – 27 हजार 687
मतदानाची टक्केवारी – 53. 09 टक्के
- विधानसभा मतदारसंघ व आमदार
अणुशक्तीनगर – तुकाराम काते (शिवसेना)
चेंबूर – प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
माहीम – सदा सरवणकर(शिवसेना)
धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
शीव–कोळीवाडा – कॅप्टन तामिळ सेल्वन (भाजप)
वडाळा – कालिदास कोळंबकर (काँग्रेस)
एकूण मतदार – 7 लाख 68 हजार 790



























































