
लोकसभा सुरळीत चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होऊनही सोमवारी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर संसद चालवण्यात रस नसल्याचा आरोप केला. लोकसभेत वारंवार गोंधळ झाल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर बोलता आले नाही, असे त्यांनी सांगितले.
सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना थरूर म्हणाले, “मी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी पूर्ण तयारी करून आलो होतो, पण तसे करण्यासाठी फारशी संधीच मिळाली नाही. सरकार आणि लोकसभा अध्यक्षांना सभागृह चालवण्यात काहीच रस नाही असे दिसतंय.”
थरूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “अर्थमंत्री सभागृहात बसलेल्या नव्हत्या. त्यामुळे स्थगन आधीच ठरले होते, असे वाटते. त्यांना सभागृह स्थगित होणार असल्याची कल्पना असावी.”
सोमवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर दोन्ही सभागृहांत चर्चा होणार होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, गोंधळामुळे चर्चा होऊ शकली नाही.
लोकसभेत दोनदा स्थगनानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. त्यावेळी पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करण्यासाठी काँग्रेस खासदार शशि थरूर यांचे नाव घेतले आणि त्यांना बोलण्यास सांगितले.
मात्र, थरूर यांनी सांगितले की विरोधी पक्षनेते बोलू इच्छितात आणि तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांना बोलू दिले जात नाही. यावर पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, पण सध्या फक्त अर्थसंकल्पावरच बोलायचे आहे, असे स्पष्ट केले.



























































