
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
‘सध्याचे राजकारण हा फिरता रंगमंच झाला असून कोणते पात्र, कोणत्या वेळी कुठे असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या गावाला प्रचाराला जायचे असेल तेव्हा संबंधित व्यक्ती कुठल्या पक्षात आहे याची खात्री करून घेतो’, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंधरा वर्षानंतर आघाडीच्या सभेला कोपरगाव ते येणार होते. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती. शरद पवार म्हणाले राजकारण मोठ्या झपाट्याने बदलत चालले आहे. एक प्रकारे तो फिरता रंगमंच झाला आहे. मीसुद्धा खात्री केल्याशिवाय प्रचाराला जात नाही, असे म्हणताच मोठा हशा पिकला.
या सरकारच्या काळात शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, विकास खुंटला आहे.
मोदी शहा हे शेतकऱ्यांसाठी नाही तर टाटा बिर्ला यांच्यासाठी सत्तेवर आहेत. देशाचा कारभार आपल्या हाती ठेवणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, असे पवार म्हणाले. आम्ही नवी पिढी तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अखिल भारतीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आर.पी. आय. कवाडे गट व मित्र पक्ष असलेल्या आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील सभेत शरद पवार बोलत होते.
या सभेसाठी राज्याचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, माजी आमदार अशोकराव काळे, युवा नेते आशुतोष काळे, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, अरुण कडू पाटील, राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, अनुराधा आदिक, अविनाश आदिक, करण ससाणे, संदीप वर्पे, माधवराव खिलारी, सुनील गंगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.


































































