
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्यातील दोन लोकसभा व तीन विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपुष्टात आला आहे. आता लक्ष 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागून राहिले आहे. राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षात लढत असून दोन्ही पक्षांचे गोव्यातील भवितव्य निवडणुकीवर अवलंबून आहे.
गेले जवळजवळ दोन महीने प्रचाराचा धुमधडाका सुरू होता. लहान मोठया सभा आणि घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांना भेटणे यावरच प्रामुख्याने सर्व पक्षीय उमेदवारांनी प्रचारासाठी भर दिला. उद्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज मतदानयंत्रासह सर्व साधनसामुग्री घेऊन नेमण्यात आलेले कर्मचारी अधिकारी सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतदार यादीत नाव असलेल्या व तसे ओळखपत्र असलेल्या मतदारांनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. मतदारांसाठी मतदान केंदावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून दिव्यांगासाठी देखील खास सोय केली आहे. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बहुतेक सर्व मतदान केंद्राबाहेर मंडप घालण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोवा लोकसभेसाठी एकूण 11 लाख 35 हजार 811 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 55 हजार 768 पुरुष तर 5 लाख 80 हजार 043 हे महिला मतदार आहेत. राज्यात सुमारे 1127 ठिकाणी एकूण 1652 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे 9275 सरकारी कामगार कार्यरत आहे. तसेच 3231 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात असून यातील जवळपास 1000 पोलीस हे केंद्रीय राखीव दलाच्या 12 तुकडयांमधील आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.
26 अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रे
एकूण 26 अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर 9 खर्चिक संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तसेच आतापर्यंत आचरसंहिता भंगच्या 54 तक्रारी नोंद झाल्या असून यातील 36 तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. तर 18 तक्रारींवर कारवाई सुरु आहे, असे कुणाल यांनी स्पष्ट केले.
मांद्रे, म्हापसा, शिरोडा या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी एकूण 133 मतदान केंद्रे आहेत. यावेळी मांद्रे मतदारसंघात एकूण 32 हजार 153 मतदार आहेत. यामधील 15 हजार 993 पुरुष तर 16 हजार 160 महिला मतदार आहेत. म्हापसा मतदारसंघात 29 हजार 212 मतदार आहेत. यामध्ये 14 हजार 367 पुरुष व 14 हजार 845 महिला मतदार आहेत. तर शिरोडा मतदारसंघात 28 हजार 962 मतदार असून यामध्ये 14 हजार 065 पुरुष तर 14 हजार 897 महिला मतदार आहेत.




























































