मुंबईत महाविकास आघाडीचा झंझावात; जाहीर सभा, रोड शोमध्ये लोटला जनसागर

मुंबईमहाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज झालेल्या जाहीर सभा, रोड शोमध्ये हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला. शिवसेना महाविकास आघाडीच्या रोड शोमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहभागामुळे रोड शोमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. जागोजागी मतदारांनी महाविकास आघाडीच्या रोड शोचे स्वागत केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिवसभर झालेल्या जाहीर सभा, रोड शोमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह घटकपक्षांच्या पदाधिकारीकार्यकर्त्यांनी सहभागी होत प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवला.

ठाणे, कल्याणमध्ये दणदणीत रोड शो

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शनिवारी ठाणे आणि कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीचा जोरदार आवाज घुमला. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात राजन विचारे तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर-राणे यांचा दणक्यात रोड शो झाला. निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे हे विजयाची हॅटट्रिक करतील आणि कल्याणमधून वैशाली दरेकर लोकसभेत जातील असे सांगतानाच  गद्दारांना धडा शिकवा असा जबरदस्त घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी शक्तीस्थळावर जाऊन शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर सुरू झालेल्या रॅलीने अवघे ठाणे दणाणून गेले.