
लोकसभेत आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याऐवजी (MGNREGA) येणारे जी राम जी बिल मंजूर करण्यात आले. या विधेयकावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. विधेयक स्थायी समितीकडे पाठवावे, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या मध्यभागी उतरून जोरदार आंदोलन केले. सभापतींनी विधेयकावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगत मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही विरोधी खासदारांनी कागद फाडत निषेध केला. हे विधेयक आता राज्यसभेत मांडले जाणार आहे.
याआधी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा, डीएमकेचे टी. आर. बालू आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी विधेयकाला विरोध केला. महात्मा गांधींचे नाव कायद्यातून काढणे म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच या विधेयकामुळे राज्य सरकारांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्याने काही खासदार पुन्हा सभागृहाच्या मध्यभागी उतरले आणि कागद फाडले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करत, तुम्हाला कागद फाडण्यासाठी जनता इथे पाठवत नाही, देश पाहतो आहे, असे सांगितले.
सभागृह तहकूब झाल्यानंतर प्रियंका गांधी वढेरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे विधेयक ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अंत करण्याच्या दिशेने आहे. या विधेयकामुळे निधीचा भार राज्यांवर टाकला जात असून राज्यांकडे आधीच पैसे नाहीत. नरेगा ही अतिगरीबांसाठी आधाराची योजना आहे आणि हे विधेयक गरीबविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी सभागृहात कागद फाडण्याच्या प्रकाराचा निषेध केला. विधेयकावर रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती आणि अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीला शोभणारे नाही, असे त्यांनी सांगितले. हे विधेयक जनहिताचे असल्याचा दावा त्यांनी केला.



























































