
मराठी भाषा दिवसानिमित्त शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कला, साहित्य, संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. उद्या, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे करण्यात येत आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या संपूर्ण परिसरात भगवे झेंडे, भगव्या पताका, मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावण्यात आले असून वातावरण मराठीमय करण्यात आले आहे. ‘शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे’ हा लघुपट, मराठी कलाकारांची चित्रफीत आणि अजितेम जोशी लिखित-दिग्दर्शित ‘माझ्या मराठीचा’च बोलू’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.



























































