महापालिकेतील रस्ते घोटाळय़ाची लोकायुक्तांकडून चौकशी करा! आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेत गेल्या सहा-सात महिन्यांत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्याची तक्रार करूनही महापालिकेच्या प्रशासकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे राज्यपालांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन मुंबईतील रस्ते घोटाळा व अन्य भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली.

शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन आदित्य ठाकरे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि यासंदर्भात निवेदन दिले. मुंबई महानगरपालिकेत प्रशासकांचे हुकूमशाही वर्तन आणि उघडपणे सुरू असलेला भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय बनला आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन, मर्जीतल्या कंत्राटदारांना दिली जाणारी कंत्राटे, रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा अशा अनेक घोटाळय़ांबद्दल विविध राजकीय पक्षांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. माध्यमे आणि मुंबईकर नागरिकांनीही त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र महापालिकेचे प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रस्ते घोटाळा रॅकेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळचे

आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील घोटाळय़ांप्रकरणी राज्यपालांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 400 किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी जानेवारीमध्ये टेंडर्स काढण्यात आली, परंतु त्यातील दहा रस्तेही अद्याप काँक्रीटचे झालेले नाहीत, असे सांगतानाच, या रॅकेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कुणीतरी आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेयांनी केला. एका ठरावीक पंपनीकडूनच खडी खरेदी करावी म्हणून मुंबईतील गोखले पूल, डिलाईल रोड पूल या पुलांची कामे तीन आठवडे बंद होती. स्ट्रीट फर्निचरची 160 कोटींची कामे 263 कोटी रुपयांना देण्यात आली, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. सध्याचे मुख्यमंत्री हे करप्टमॅन आहेत अशीही टीका त्यांनी केली.