मोदी है तो मुमकीन है, केंद्रात पुन्हा एनडीएचेच सरकार… आज निकाल

648

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महापर्वाची सांगता आज होत आहे. 17व्या लोकसभेच्या निकालाकडे केवळ देशाचेच नाहीतर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. सर्वच ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार सत्तेवर येणार आहे. आज दुपारपर्यंत देशवासीयांचा कौल स्पष्ट होईल आणि ‘येऊन येऊन येणार कोण? मोदींशिवाय आहे कोण? मोदी है तो मुमकीन है!’ यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, या निकालात कोणाचा ‘निकाल’ कसा लागतो हे पाहणेही औत्सुकतेचे असणार आहे.

10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. 2 महिने 13 दिवसांनी उद्या मतमोजणी होत आहे. दीर्घकाळ चाललेल्या या निवडणूक प्रक्रियेची आचारसंहिता 29 मेपर्यंत असणार आहे.

विरोधी पक्षांचे काय?
– ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 100 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यात काँग्रेसला किती जागा मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 2014 ला काँग्रेसची धुळधाण झाली होती. अवघ्या 44 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते.

– उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामीळनाडूत द्रमुक-काँग्रेस आघाडी, केरळात डावे पक्ष, ओडिशात बीजेडी, आंध्र प्रदेशात तेलगू देसम यांना किती जागा मिळतात याकडेही देशाचे लक्ष असेल.

चंद्राबाबू, पटनाईक यांचे काय होणार?
लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभेचाही उद्या निकाल लागणार आहे. 22 विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी तेलगू देसम अध्यक्ष, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रयत्न करताना दिसत आहेत, पण आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू स्वतःचे राज्य संभाळणार का याकडे देशाचे लक्ष असेल. ओडिशात नवीन पटनाईक हे गेली 19 वर्षे मुख्यमंत्री आहेत. यावेळी त्यांच्या बिजू जनता दल पक्षास ओडिशातील जनता काय कौल देईल याची उत्सुकता आहे.

अशी पार पडली निवडणूक प्रक्रिया
– 10 मार्चपासून देशभर आचारसंहिता लागू.
– 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान सात टप्प्यांत लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झाले.
– तब्बल 90 कोटी मतदार हे मतदानासाठी पात्र होते. जगातील सर्वांत मोठी निवडणूक प्रक्रिया होती.
– देशातील 67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. हे लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान आहे.
– यावेळी पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’ला व्हीव्हीपॅट मशीन जोडले गेले.
– लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभांचाही आज निकाल लागणार आहे.

2014ची स्थिती
एकूण जागा – 543
बहुमतासाठी – 272
भाजपऔमित्रपक्ष – 336
काँग्रेसऔमित्रपक्ष – 60

महाराष्ट्रात युतीच
– एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीलाच मोठे यश मिळणार आहे. युतीला 38 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज आहे.

– 2014ला महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 23, शिवसेना 18 अशा 41 जागांवर युतीचा दणदणीत विजय झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या.

‘एक्झिट पोल’मुळे आनंदोत्सव
– रविवारी मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडल्यानंतर देशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने ‘एनडीए’ला दणदणीत बहुमत मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार सत्तेवर येईल असा स्पष्ट अंदाज वर्तविला आहे. 2014 ला एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता.

– ‘एक्झिट पोल’नंतर एनडीएसह देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोदीच पंतप्रधान असतील असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या