
लोणंद येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मरला बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला असून तो पूर्ववत होण्यास 24 तास लागण्याची शक्यता आहे.
लोणंद येथील 132 केव्ही सबस्टेशन लाईनवरील एका मोठ्या ट्रान्सफार्मरला अचानक आग लागण्याबरोबरच सुमारे पंधरा ते वीस मिनिटे स्फोटासारखे आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरी वस्तीमधे काही काळ घबराट पसरली होती. लागलेल्या आगीचे व धुराचे लोळ आजूबाजूच्या चार- पाच किलोमीटर अंतरावरूनही दिसून येतं आहेत. आगीला आटोक्यात आणण्यासाठी महावितरण कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी घटनास्थळी करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी असलेल्या नियमांना धाब्यावर बसवून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन बघ्यांची गर्दी तातडीने पांगवली. आग विझवण्यासाठी फलटण येथील अग्निशमन दलाची गाडी साडेबारा वाजता आलेली असून त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार 132 केव्ही सबस्टेशनच्या मुख्य लाईनवर झालेल्या या बिघाडामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव या तालुक्यातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात बाधीत होणार आहे. तसेच याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो.




























































