अंगाई गीत ऐकल्यानंतर बाळाला झोप का लागते?

455

सामना ऑनलाईन। लंडन

अंगाई गीत गाऊन बाळाला झोपवणं ही तशी जुनीच पद्धत आहे. आपल्यातील जवळजवळ प्रत्येकालाच याचा अनुभवही आहे. पण तरीही अंगाई गीत ऐकल्यानंतर बाळ पटकन का झोपतं, या प्रश्नाच उत्तर तसं फारस कोणाला माहीत नाही. पण इंग्लडमधील ग्रेट ऑरमंड स्ट्रिट रुग्णालयात संशोधकांनी यावर नुकतचं एक संशोधन केलं. यात अंगाई गीत ऐकल्यामुळे बाळावर होणाऱ्या परिणामावर संशोधन करण्यात आले.

त्यात अंगाई गीताचा बाळावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे समोर आले. अंगाई गीत ऐकल्यामुळे बाळाला वेदनेचा विसर पडतो. त्याचे लक्ष फक्त अंगाई कडे असल्याने त्याचे इतर त्रासाकडे लक्ष जात नाही. तसेच अंगाई गीत ऐकत असताना आपण एकटे नसून आपल्यासोबत अजून कोणीतरी आहे या भावनेमुळे बाळाला सुरक्षित वाटते. यामुळे ते निश्चिंतपणे झोपते. असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हे संशोधन तीन वर्षाहून लहान असलेल्या बालकांवर करण्यात आले होते. यासाठी 37 मुलांची निवड करण्यात आली होती. यातील बहुतेक मुलांना श्वसनाचा त्रास होता. या मुलांचे 10 -10 मिनिटांच्या अंतराने निरीक्षण करण्यात आले. यातील एका बाळाला विविध हावभाव करून झोपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसऱ्या बाळाला अंगाई गीत ऐकवण्यात आले. तर तिसऱ्या बाळाला मात्र एकटे सोडून देण्यात आले. यावेळी अंगाई गीत ऐकूण पट्कन झोपलेल्या बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्य असल्याचे व त्याच्या वेदना कमी झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.

यावरून अंगाई गीतं बाळाच्या मनावर परिणाम करत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तसेच अंगाई गीतामुळे बाळाला सुरक्षित वाटते. यामुळेच जगातील बहुतेक बाळं पहिल्यांचा आई हाच शब्द उच्चारतात असेही संशोधकांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या