नगर मनपा कर्मचाऱ्यांचा ‘लाँग मार्च’ , 17 ऑक्टोबरला मंत्रालयावर धडक देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळी मनपा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱयांनी मुंबईकडे कूच केले. नगर ते मुंबई या ‘लाँग मार्च’मध्ये महापालिकेचे एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी हा ‘लाँग मार्च’ मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहे.

मनपा कर्मचाऱयांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने नोकरी मिळावी, यासाठी नगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला होता. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाँग मार्चला प्रारंभ झाला. जोपर्यंत कर्मचाऱयांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

नगरमधून सुरू झालेला लाँग मार्च 17 ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहे. त्यामुळे मनपाच्या अत्यावश्यक सेवा, आरोग्य, पाणीपुरवठा व फायर ब्रिगेड वगळून मनपाचे सर्व कामकाज ठप्प राहणार आहे. लाड समितीच्या शिफारशीनुसार तत्काळ वारसाहक्कानुसार कर्मचाऱयांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केली. लाँग मार्चमध्ये आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, महादेव कोतकर, गुलाब गाडे, राहुल साबळे, विठ्ठल उमाप यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.

दरम्यान, कर्मचाऱयांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ठेकेदारामार्फत साफसफाई कर्मचारी नेमले असले, तरी त्यांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी, आज सकाळी शहरात कचऱयाचे ढीग पसरल्याचे पाहायला मिळाले. मनपा कर्मचाऱयांचे हे आंदोलन 17 दिवस सुरू राहणार आहे.