
म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्याने म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातान्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. खासकरून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी ही माहिती गोळा करण्यासाठी जादा स्टाफ ठेवावा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
म्हाडा वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात कामानिमित्त दिवसाला चार ते पाच हजार नागरिक येतात. ज्यांना घराचे पझेशन किंवा इतर कामानिमित्त मुख्यालयात जायचे आहे किंवा अधिकाऱ्यांना भेटायचे आहे त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करावा लागतो. म्हाडाने नुकतीच व्हिजिटर प्रोफायलिंग सुरू केली आहे. त्यानुसार मुख्यालयात येणाऱ्या नागरिकाचे नाव, पह्न नंबर, आयडी प्रूफ, त्यांना कोणत्या विभागात आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे अशी माहिती गोळा केली जाते तसेच वेबपॅमवर त्यांचा फोटो काढला जातो. त्यानंतर फेशियल रिकग्निशनद्वारे गेट खुला होतो. मात्र ही माहिती गोळा करण्यासाठी तीनच काऊंटर असल्यामुळे दुपारी भर उन्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागतात. म्हाडा मुख्यालयात शिवशाही पुनर्वसन, राज्य महिला आयोग, उपनिबंधक कार्यालय, अशी वेगवेगळी कार्यालये आहेत. तिथे येणाऱ्या नागरिकांनाही या प्रक्रियेतून जावे लागत आहे.