लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश

फोटो प्रातिनिधीक

राज्य गृहविभागाने पुणे पोलीस  आयुक्तालयाची पुनर्रचना केली असून आता लोणीकंद (ग्रामीण) आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांना पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्यांअंतर्गत होणारे कामकाज पोलिस आयुक्तालयाच्या अख्यत्यारित चालणार आहे.

पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर पुणे शहर पोलीस दलाची रचना बदलली होती. पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय झाल्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयातंर्गत काही पोलीस ठाणे कमी झाले होते. त्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील हवेली, लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार गृहविभागाने लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलिस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट केल्याचे परिपत्रक काढले आहे.

शहरात परिमंडळ पाचला मंजुरी
शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चार झोनतंर्गत कामकाज सुरु होते. मात्र, वाढत्या विस्तारामुळे झोन पाचच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार आता गृहविभागाने पुणे पोलिसांच्या झोन पाचला मंजुरी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या