
सामना प्रतिनिधी । बीड
तुमच्या धाकट्या मुलाला आघात होणार आहे, असं म्हणत एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेस तुमच्या जवळील सोने-चांदी पर्समध्ये ठेवून शेजारच्या व्यक्तीला द्या अन् दहा पावले पाठीमागे चालत कुलदैवताचे नाव घ्या, असं म्हणून सदरील वृद्ध महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या पर्समध्ये सोन्या-चांदीचे दागिन्यांसह नगदी २२ हजार असा एकूण दोन ते अडीच लाख रूपयांचा ऐवज एका भामट्याने लुटून नेल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर घडली.
बीडशहरातील तिरूपती कॉलनी भागात राहणारे ६९ वर्षीय निवृत्त मुख्याध्यापिका सुशिला पुरूषोत्तम कुलकर्णी या शिवाजीनगर एसबीआय बँकेत बुधवारी दुपारी तीन वाजता आल्या होत्या. या दरम्यान पत्ता विचारण्याच्या कारणावरून एक अज्ञात मी हरिद्वारचा आहे, असं म्हणत त्यांच्याशी बोलू लागला. त्याच दरम्यान अन्य एक अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आला. या दोघांनी सदरील महिलेस बोलते केले. हरिद्वारचा आहे हे सांगणाऱ्या व्यक्तीने तुमच्या धाकट्या मुलाला आघात होणार आहे, असे सांगून तुमच्या जवळील सोनंनाणं पर्समध्ये ठेवून ती पर्स बाजूच्या व्यक्तीच्या हातात द्या, असं म्हणत त्या वृद्धेस कुलदैवताचे नाव घेत दहा पावले मागे जा, असे म्हटले. त्यानंतर ते दोघेही तेथून पळाले, जेव्हा सुशिला कुलकर्णी भानावर आल्या तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, पर्समधील नगदी २२ हजार ७५०, अडीच तोळ्याच्या पाटल्या (किंमत एक लाख २५ हजार), दीड तोळ्याची सोन्याची चैन (किंमत ४५ हजार) असा एकुण दोन ते अडीच लाख रूपयांचा ऐवज घेवून ते अज्ञात दोन भामटे फरार झाले. त्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास आर.बी.गायकवाड हे करत असल्याची माहिती जी.बी.शेळके यांनी दिली.






























































