प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येतच ही हिंदूंची श्रद्धा! ऍड. वैद्यनाथन यांचा जोरदार युक्तिवाद

180

अयोध्या हीच प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असून प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येतच झाला होता,  ही तमाम हिंदूंची श्रद्धा आहे. हिंदूंचा हा विश्वास कितपत तर्कसंगत आहे याचा शोध घेण्याचा न्यायालयाने आणखी पुढे जाऊन प्रयत्न करू नये, असा युक्तिवाद रामलल्ला विराजमानचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला.

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ऍड. वैद्यनाथन यांनी अयोध्या येथील वादग्रस्त वास्तू ही हिंदूंच्या भावनेशी निगडित असल्याचाही दावा केला. मुगल प्रशासक अकबर आणि जहांगीर यांच्या काळात हिंदुस्थानात भटकंतीला आलेल्या विल्यम फिंच आणि विल्यम हॉकिन्स या ब्रिटिश नागरिकांनी आपल्या प्रवास वृत्तांतात रामजन्मभूमी आणि अयोध्येचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, असेही ऍड. वैद्यनाथन यांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणले.

यावेळी युक्तिवाद करताना ऍड. वैद्यनाथन म्हणाले की, विल्यम फिंच हे 1608 ते 1611 अशी चार वर्षे अयोध्येत वास्तव्याला होते. या काळात त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये रामजन्मभूमीचा स्पष्ट उल्लेख आहे. अयोध्येला भेट देणारी दुसरी व्यक्ती म्हणजेच जोसेफ टाईटन बॅरल. बॅरल यांनीदेखील आपल्या प्रवास वृत्तांतात राममंदिराबद्दल माहिती दिली आहे. फिंच, टाईटन हॉकिन्स आणि इतर ब्रिटिश नागरिकांनी लिहिलेल्या प्रवास वृत्तांताची सलग माहिती विलियम फोस्टरने आपल्या ‘अर्ली ट्रव्हल्स इन इंडिया’ या पुस्तकात दिल्याचेही ऍड. वैद्यनाथन म्हणाले.

आज दिवसभर ऍड. वैद्यनाथन यांनी रामजन्मभूमीच्या मुद्दय़ावर जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद सुरू असताना ‘वादग्रस्त वास्तूला पहिल्यांदा केव्हा बाबरी मशीद संबोधण्यात आले’ असा सवाल केला. त्यावर त्यांनी 19व्या शतकात असे उत्तर दिले. 19व्या शतकापूर्वी या वास्तूला बाबरी मशीद संबोधण्यात आल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, असेही ऍड. वैद्यनाथन यांनी सांगितले.

मुघल सम्राट बाबर याच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह असलेल्या ‘बाबरनामा’मध्ये वादग्रस्त वास्तूचा काहीही उल्लेख नाही का, असा सवाल खंडपीठाने केला. त्याला होकारार्थी उत्तर देत ऍड. वैद्यनाथन यांनी ‘बाबरनामा’ त्याबाबत निःशब्द आणि मूक आहे असे सांगितले. राममंदिर पाडून टाकण्यासाठी बाबरनेच आदेश दिला होता असा एखादा वस्तुनिष्ठ पुरावा उपलब्ध आहे काय असा खंडपीठाने  सवाल करताच, बाबरनेच आपल्या जनरलला हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले, असे ऍड. वैद्यनाथन यांनी ठणकावून सांगितले.

स्कंद पुराणाचा उल्लेख

आपल्या युक्तिवादादरम्यान हिंदू पक्षाच्या वकिलांनी शरयू नदीत स्नान केल्यानंतरच रामजन्मभूमीच्या दर्शनाचा लाभ होतो असा दावा केला. त्यावेळी स्कंद पुराण केव्हा लिहिले गेले, असा सवाल खंडपीठाने केला. त्यावर हे पुराण वेद व्यासांनी महाभारतकाळात लिहिले असे उत्तर दिले; परंतु किती जुने आहे ते कुणालाही माहीत नाही, असेही ते म्हणाले. परंतु तुम्ही जे सांगत आहात त्यात रामजन्मभूमीच्या दर्शनाबद्दल म्हटले गेले आहे. कुणा देवताबद्दल नाही याकडे खंडपीठाने लक्ष वेधताच, जन्मस्थळ स्वतः एक देवता स्वरूप असल्याने तसे म्हटले गेल्याचे ऍड. वैद्यनाथन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या