
बापाचे पैसे शेअर मार्केटमध्ये हरलेला इंजिनीयर तरुण सोनसाखळी चोर बनल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जयेश देशमुख (२४) असे त्याचे नाव असून त्याने वडिलांच्या सेवानिवृत्तीचे पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मात्र वडिलांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी जयेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी खालापूर पोलिसांनी जयेशला बेड्या ठोकल्या आहेत.
इलेक्ट्रिक डिप्लोमा केलेला जयेश बेरोजगार असून तो शेअर मार्केटच्या आहारी गेला होता. त्याने वडिलांच्या सेवानिवृत्तीचे सर्व पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले. मात्र त्याला गुंतवलेल्या पैशांचा परतावा मिळाला नाही. दरम्यान त्याच्या वडिलांनी पैशांसाठी तगादा लावला. वडिलांचे पैसे परत कसे करायचे अशा विवंचनेत पडलेल्या जयेशने महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. त्याने शहरातील पादचारी महिलांना निशाणा केला आणि दुचाकीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चेन लांबवण्यास सुरुवात केली.
शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याच्या तक्रारी दाखल होताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक रवाना केले. या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला असता चोरटा अंगावरील शर्ट व मोटारसायकलची नंबर प्लेट बदलताना दिसला. त्यानुसार चोरट्याची ओळख पटली आणि पोलिसांनी जयेशला जेरबंद केले.





























































