लोकलमधील पाकिटाचा वनवास संपला! 14 वर्षांपूर्वी हरवलेले पाकीट सापडले

2233

आजच्या धावपळीच्या जीवनात जगण्याचे सर्व संदर्भ पटापट बदलत असताना पनवेलच्या एका प्रवाशाला एक दिवस अचानक, ‘तुमचे 2006 रोजी पनवेल लोकलमधून चोरीला गेलेले पाकीट सापडले असून ओळख पटवून घेऊन जा’, असा वाशी पोलिसांचा फोन आल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विशेष म्हणजे, त्यात असलेले 900 रुपयेदेखील सहिसलामत असल्याचे त्यांना कळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हेमंत पाडळकर यांचे सीएसएमटी ते पनवेल लोकलच्या प्रवासात 2006 साली पाकीट गहाळ झाले होते. एप्रिल महिन्यात त्यांना वाशी जीआरपी पोलिसांनी कॉल केला आणि त्यांचे पाकीट सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी या असे सांगितल्याने पाडळकर यांना विश्वासच बसेना. एक तर या घटनेला तब्बल 14 वर्षे झाल्याने सुरुवातीला ते गोंधळले. त्यानंतर लॉकडाऊन असल्याने ते पाकीट घेण्यास लागलीच आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकीट मिळाल्याचा खूप आनंद

आपले पाकीट जसेच्या तसे मिळाल्याने खूप आनंद झाल्याचे पाडळकर यांनी सांगितले. ज्याने पाकीट चोरले होते त्याला मागे अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही चोरटय़ाकडून नऊशे रुपये असलेले पाकीट हस्तगत केले. पाचशे रुपये बदलून आल्यानंतर तेही त्यांना परत करू, असे पोलिसांनी सांगितले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पनवेलला राहणारे पाडळकर नवी मुंबईत एका कामासाठी आल्यानंतर त्यांनी वाशी जीआरपी पोलीस ठाणे गाठले. विशेष म्हणजे, त्यांच्या पाकिटातील त्यांचे 900 रुपये जसेच्या तसे होते. त्यात 500 रुपयांची एक जुनी नोट होती. (2016 च्या नोटाबंदीमुळे चलनातून बाद) ती वगळून पोलिसांनी उर्वरित तीनशे रुपये परत केले. त्यातील शंभर रुपये स्टॅम्प पेपरचा खर्च म्हणून कापून घेतले. पाचशे रुपयेही बदलून नवी नोट देणार असल्याचे पोलिसांनी पाडळकर यांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या