लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कारखान्यांना नोटीसा

रासायनिक उत्पादन घेताना शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना प्रदुषण मंडळाने नोटीसा बजावल्या असून प्रदुषणाबाबत तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. पावसाळ्यात काही रासायनिक कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडल्याच्या तक्रारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने कारखानदारांना समज देण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण मंडळाच्या कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे. मंडळाच्या या कारवाईमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. जलप्रदुषणामुळे दाभोळ खाडीतील मासे मरणे, परिसरातील जलस्त्रोत दुषीत होणे या घटना वारंवार घडत आहेत. दाभोळ खाडीत मासेमारी करून उपजिविका करणारे मच्छिमार वारंवार प्रदुषणाच्या नाव्याने टाहो फोडत आहेत. मात्र त्यांची दखल घ्यावी असे कुणालाही वाटत नाही.

परिसरातील जलस्त्रोत दुषीत झाल्याने ग्रामस्थांवर भर पावसात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. मात्र बिसलेरीचे पाणी पिणारे कारखानदार आणि अधिकारी यांना त्याचे काहीही सोयर-सुतक नाही.मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले की कारखानदार थेट या नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडण्याचे पाप करत आहेत. तीव्र रसायन मिसळलेले हे पाणी आजुबाजुचे जलस्त्रोत दुषीत करत दाभोळ खाडीत जात आहे. तिथल्या जलचरांचा जीव घेत आहे याचे कारखानदारांना काहीही देणे घेणे नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सुरुच आहे.लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करण्याचे काम सुरु आहे. मात्र या सर्वच तक्रारींची दखल घेतलीच जाईल अशी परिस्थिती नसल्याने ज्या उद्देशाने संघर्ष समितीची स्थापना झाली तो उद्देश सफल होताना दिसत नाही.

काही दिवसांपुर्वी येथील शिवालिक या रासायनिक कारखान्याचे सांडपाणी थेट नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आल्याचे उघड झाले होते. संघर्ष समिती आणि महसुलच्या भरारी पथकाने शिवालिकच्या व्यवस्थापनाचे हे पाप उघडकीस आणले होते. या घटनेनंतर जाग आलेल्या उपप्रादेशिक प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणाबाबतचे नियम पायदळी तुडविणाऱ्या कारखान्यांना समज देण्याऱ्या नोटीसा बजावल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या