सनम बेवफा! हिंदुस्थानात प्रेमप्रकरणं ठरताहेत हत्येचं तिसरं मोठं कारण

972
murder-knife

गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानात हत्येचं इतर जगाच्या तुलनेत कमी झालं आहे. पण, या हत्यांमागे प्रेमप्रकरण हे कारण असल्याच्या घटनांमध्ये मात्र वाढ होताना दिसत आहे. देशातील हत्येच्या कारणांमध्ये तिसरं मोठं कारण प्रेमप्रकरण असल्याचं एका अहवालातून उघड झालं आहे.

एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने एक अहवाल नुकताच जारी केला आहे. या अहवालात 2001 ते 2017 पर्यंतच्या हत्यांच्या प्रकरणांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. 2001मध्ये जवळपास 32,202 इतकी हत्या प्रकरणांची नोंद झाली होती. हाच आकडा 2017मध्ये घटून 28,653पर्यंत आला. यात सूडभावनेपोटी केलेल्या हत्यांचं प्रमाण 4.3 टक्क्यांनी घटलं आहे, तर संपत्तीच्या वादातून होणाऱ्या हत्यांमध्ये 12 टक्के घट दिसून आली आहे. तर त्या तुलनेत अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणं यांमुळे होणाऱ्या हत्यांमध्ये जवळपास 28 टक्के इतकी वाढ झाली आहे. ही प्रकरणं आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात घडली आहेत. तर तुलनेने दिल्ली, कर्नाटक, तमीळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रेमप्रकरण हे हत्येचं दुसरं मोठं कारण असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

यातील बहुतांश हत्या या अनैतिक संबंध, प्रेमत्रिकोण अशा प्रकारच्या घटनांमधून झाल्या आहेत. तर काही प्रकरण ही ऑनर किलिंग असल्याचंही अहवाल सांगतो. ऑनर किलिंगच्या प्रकरणातही वाढ झाली असून 2016मध्ये 71वर असलेली ही प्रकरणे 2017मध्ये 92वर पोहोचली असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या