
लोअर परळ पुलाचे रेल्वेच्या अखत्यारितले काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतरच मुंबई महानगरपालिकेला त्यांच्या अखत्यारितील पुलाचे काम सुरू करता येणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टनमधील वाहतूककोंडी कायम राहणार आहे, अशी माहिती पूल विभागातील अधिकाऱ्य़ाने दिली. हा पूल धोकादायक झाल्याने 3 फेब्रुवारी 2019 मध्ये पाडण्यात आला, मात्र एक वर्ष उलटूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर 314 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले. त्यानंतर जुने आणि धोकादायक ठरलेले 23 पूल पाडण्यात आले. पाडण्यात आलेल्या पुलांपैकी 98 वर्षे जुना लोअर परळचा पूल पश्चिम रेल्वेने पालिकेच्या सहकार्याने विशेष मेगाब्लॉक घेत पाडला. पूल पाडल्यानंतर नवीन पूल एक ते दीड वर्षात वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले होते. मात्र अद्याप रेल्वेच्या अखत्यारितील पुलाचे काम सुरू असल्यामुळे पालिकेला त्यांच्या अखत्यारित येणाऱ्य़ा पुलाचे काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे पुलाचे काम आणखी काही महिने रखडू शकते, अशी माहिती पूल विभागातील अधिकाऱ्य़ाने दिली.




























































