लोअर परळ पुलाचे काम वेगात सुरू, लॉकडाऊनमध्ये एका दिशेचे काम पूर्ण केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपूर्वी सेफ्टी ऑडिटमध्ये धोकादायक ठरवून पाडण्यात आलेल्या लोअर परळच्या पुलाचे काम जोरात सुरू आहे. गेल्यावर्षी हा पुल रेल्वेने ब्लॉक घेऊन पाडून टाकला, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांचे प्रचंड हाल झाले. या पुलाची जबाबदारी कोणाची यावरूनही चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर रेल्वेचा भाग रेल्वेने तर पालिकेच्या हद्दीचा भाग मुंबई महानगर पालिकेने बांधावयास घेतला. आता या पुलाचा पश्चिम बाजूकडील ‘राफ्ट फाऊंडेशन’चे काम पश्चिम रेल्वेने लॉकडाऊनमध्येही पूर्ण केले आहे. त्याकरीता ६८५ क्युबिक मीटर काँक्रिट, ९२ मेट्रीक टन स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला असून ९३ अभियंत्यांच्या टीमने भर पावसाळ्यात सलग १४ तासांत पश्चिम बाजूकडील राफ्ट फाऊंडेशनचे काम पूर्ण केले आहे.

अंधेरीतील गोखले पुलाची मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सर्व पुलांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुरक्षा ऑडिटमध्ये आयआयटीच्या तज्ज्ञांनी या ब्रिटीशकालिन डीलाईल (लोअर परळ) पुलाला धोकादायक ठरविले होते. या शंभर वर्षे जुन्या पुलाला २४ जुलै २०१८ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आले. पश्चिम रेल्वेला या ब्रिटीशकालिन पुलाला तोडण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागला. त्यासाठी ७.२ कोटीचा खर्च करण्यात आला. हे काम फेब्रुवारी २०१९ मध्ये अखेर पूर्ण झाले.

– मान्सून वगळून दहा महिन्याचे काम

या पुलाचा रेल्वेवरील गर्डरचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ८७ कोटींचे टेंडर मंजूर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही पुलाच्या पश्चिम बाजूकडील राफ्ट फाऊंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उड्डाण पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील काम मान्सूनचे महिने वगळता दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

– कोटा येथून स्टीलचे १८०० टनचे गर्डर दाखल
या पुलाच्या गर्डरसाठीचे काम रेल्वेच्या आरडीएसओच्या मान्यतेनूसार कोटा येथील कारखान्यात करण्यात आले आहे. ई-४५० ग्रेडचे १८०० मेट्रिक टनचे ( एकूण वजन २५०० मेट्रिक टन) पोलादी गर्डर पश्चिम रेल्वेला प्राप्त झाले आहेत. या पुलाच्या शहराच्या हद्दीत जाणारे तीन भाग त्यांचे काम करण्यासाठी मान्सूनचे चार महिने वगळता एकूण १८ महिन्यांचे टार्गेट गृहीत धरीत पालिकेने २७ जानेवारी रोजी टेंडर मागविले आहे.या पुलाचे काम पालिका मान्सूनचे महिने वगळून १८ महिन्यात करणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

– पुल तयार होण्यास मार्च २०२२ उजाडणार
या पुलाचे तीन जोड भाग असून दोन भाग पश्चिम बाजूला आहेत. या पुलाच्या प्रत्येक गर्डरचे वजन तब्बल १८०० टन असल्याने त्यांना एका जागेहून दुसरीकडे उचलून आणणे अशक्य आहे. त्यामुळे त्याला उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडे जोडण्यात येऊन पुढे पुढे सरकवावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेला तोपर्यंत पश्चिमेकडील बाजूचे काँक्रिटच्या जुने बांधकाम तोडून नवे बांधकाम बांधावे लागणार आहे. त्यामुळे सर्व जोडणारे मार्ग बांधण्यासाठी मार्च २०२२ चे टार्गेट देण्यात आले आहे.