लोअर परळ वर्कशॉपचा होणार कायापालट, कार्यशाळेचे अत्याधुनिकीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

गुजरातवरून मुंबईच्या बंदरात कापूस आणण्यासाठी ब्रिटिशांनी बॉम्बे बडोदा ऍण्ड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) कंपनी स्थापन करून एप्रिल 1867 मध्ये विरार ते चर्चगेट मार्ग बांधला गेला. त्यामुळे 1870 ते 76 काळात डब्यांच्या डागडुजीसाठी बांधण्यात आलेल्या लोअर परळ वर्कशॉपचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

14 हेक्टर परिसरात पसरलेल्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये 280 महिलांसह 3,400 कर्मचारी काम करीत असून दर महिन्याला 150 कोचेसची डागडुजी करण्यात येते. त्यात एकतृतीयांश कोचेस हे राजधानी एक्प्रेसमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचेस आहेत. या वर्कशॉपच्या अत्याधुनिकीकरणासाठी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील हेडक्वार्टरने विस्तृत प्रकल्प तयार केला असून 176 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती चीफ वर्कशॉप मॅनेजर अखिलेश कुमार यांनी दिली.

लोअर परळच्या वर्कशॉपमध्ये राजधानीसाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक एलएचबी कोचही डागडुजीसाठी येतात. पीरिऑडिक ओव्हरहॉलिंगसाठी (पीओएच) येणाऱ्या 150 कोचेसपैकी 40 कोचेस हे जर्मनीच्या लिंके हॉफमन बुश अर्थात ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे असतात. या कोचेसची लांबी आयसीएफ कोचेसपेक्षा दोन मीटर जादा असते. आता पारंपरिक आयसीएफ कोचेसचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. सामान्य आयसीएफचे कोचेसचे वजन 44 टन तर एलएचबी कोचेसचे वजन 40 टन इतके असते. अत्याधुनिक एलएचबी कोचेसने अपघातात कमी मनुष्यहानी होते. त्यांच्या मेंटेनन्ससाठी अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. आयसीएफ कोचला डागडुजीसाठी 21 दिवस तर एलएचबी कोचेसना 14 दिवस लागतात. आयसीएफ कोचेसला दर दीड वर्षाने तर एलएचबी कोचला तीन वर्षांनी मेंटेनन्ससाठी पाठवावे लागते. त्यांचे आयुर्मानही 35 वर्षांचे असते जे आयसीएफ कोचेसपेक्षा दहा वर्षे अधिक असते. आयसीएफमध्ये केवळ 72 तर एलएचबीत 80 सीटस् असतात.

रोबोट करतात एसीचे डक्ट साफ

पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या वातानुकूलित डब्यांच्या डागडुजीकरिता खास रोबोटद्वारे काम केले जाते. खास निर्मिती कंपनीद्वारे हे काम केले जाते. जेथे मनुष्याचे हात पोहचताना अडचण येते अशा एसी यंत्रणेच्या डक्टमध्ये शिरून रोबोटद्वारे धूळ आणि जाळय़ा हटविण्याचे काम केले जाते. डक्टमध्ये आत शिरण्यासाठी मंगळावर जसे रोव्हर रोबोट पाठवून काम करतात त्याच पद्धतीने छोटे रोबोट ब्रश फिरवित आतील जळमटं हटवितात.