मोदी है तो मुमकीन है! रेल्वे भाड्यानंतर आता घरगुती गॅसही महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. लांबचा रेल्वे प्रवास आजपासून महाग झालेला आहेच. त्यात घरगुती गॅस सिलिंडरची भर पडली आहे. आजपासून विनाअनुदानित सिलिंडर 19.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडले असून ‘हॅप्पी’ नव्हे तर ‘अनहॅप्पी न्यू इयर’ म्हणायची वेळ आली आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’सारख्या जाहिरातींचा फोलपणाच यापुढे सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

रेल्वे बोर्डाने मंगळवारी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रत्येक किलोमीटरमागे 1 ते 4 पैसे वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आताची वाढ ही प्रमुख महानगरांमध्ये 21.50 रुपयांपर्यंत झाली आहे. मुंबईत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचा नवा दर 684.50 रुपये झाला आहे, तर दिल्लीत 714 रुपये मोजावे लागतील. घरगुती गॅस सिलिंडरसोबतच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत 33 रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दर आजपासूनच लागू केले आहेत. याचा फटका छोटय़ा व्यावसायिकांना बसणार आहे. परिणामी हॉटेल व्यावसायिकांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.

वाणिज्य सिलेंडरच्या किंमती
शहर किंमत (रुपये)
दिल्ली 1241
मुंबई 1190
कोलकाता 1308.50
चेन्नई 1363

सलग पाच महिने होतेय वाढ
1 ऑक्टोबरला देशांतील प्रमुख महानगरांत विनाअनुदानित सिलिंडर 15 रुपयांनी महागला होता. नवी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 605 रुपये, मुंबई व चेन्नईत हे दर अनुक्रमे 574.50 आणि 620 रुपये इतके झाले होते. कोलकात्यात हा दर 630 रुपये होता. ऑगस्ट महिन्यात सिलिंडर जवळपास 62 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र प्रत्येक महिन्यात गॅसच्या किमती वाढल्या आहेत.

घरगुती सिलिंडरचा नवा दर
शहर किंमत (रुपये)
दिल्ली 714
मुंबई 684.50
कोलकाता 747
चेन्नई 734