जिभेवर चिकटवताच नशेची धुंदी… तरुणाई टार्गेट; कल्याणमध्ये सापडले 1 कोटीचे पेपरबॉम्ब, त्रिकुटाला बेडय़ा

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱया एलएसडी पेपर अर्थात ‘पेपरबॉम्ब’ या ड्रग्जचा तब्बल एक कोटीचा साठा आज कल्याणमध्ये जप्त करण्यात आला. ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल 1 हजार 466 एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून त्यांना कल्याण न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ड्रग पेडलर्स पुन्हा प्रचंड सक्रिय झाले आहेत. कल्याण येथे ड्रग्ज विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड या ठिकाणी सापळा लावण्यात आला. पोलिसांनी भाविक ठक्कर (22) या संशयित तरुणास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एलएसडी पेपरबॉम्ब मिळाले. आरोपीची अधिक चौकशी केली असता आणखी दोन बडय़ा ड्रग्ज पेडलर्सची नावे समोर आली. त्यानुसार मनी भार्गव आणि निवांत विल्हेकर या ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची झडती घेतली असता यातील भार्गव याच्या घरात तब्बल 1 हजार 228 एलएसडी पेपर सापडले. तर विल्हेकर याच्या घरातून एकूण 239 एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. या सर्व पेपरबॉम्बची पिंमत तब्बल 1 कोटी 2 लाख 62 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985चे कलम 8 (क), 22 (क) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

हा अमली पदार्थ कागदाच्या तुकडय़ाएवढा असतो. खिशातील पाकिटात किंवा घरात कुठेही ठेवला तरी यावर संशय येत नाही. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांवर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

– विजय पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी  पथक.

सुपरमॅन, बॅटमॅन… 10 तास झिंग

एलएसडी म्हणजेच पेपरबॉम्ब हा अमली पदार्थ म्हणजे एक छोटासा कागदी तुकडा असतो. त्यावर पक्षी-प्राण्यांची चित्रे असतात. या कागदावर ‘लेसरजीक ऑसिड डाय एथिल अमाइड’ हे अमली द्रव शिंपडले जाते. त्यानंतर या पेपरवरील दोन ते तीन इंच कागदी तुकडा तब्बल 5 हजार रुपयांना विकला जातो. या कागदाच्या खरेदीसाठी नशेबाज सुपरमॅन, बॅटमॅनसारखे परवलीचे शब्द वापरतात. या कागदाला जिभेवर ठेवल्यानंतर तब्बल 10 ते 12 तास नशेची झिंग येते.

तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का?

घरात कमी बोलणे, रात्रीच्या जेवणाला न येता सतत पार्टी करून उशिरा घरी येणे ही एलएसडीसह कोणतेही अमली पदार्थ सेवन करणाऱया मुलांची लक्षणे आहेत. तसेच या मुलांचे डोळे लाल असतात. त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे अशा मुलांचे नेमके मित्र कोण, याबाबत पालकांनी जागरूक असावे, असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या