
‘ग्रीन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लुधियानाच्या रोहित मेहरा यांनी देशभरात सुमारे 100 हरितपट्टे विकसित केले आहेत. एक प्रकारे ही मिनी वनेच आहेत. शासकीय सेवेत नोकरी करताना वेळात वेळ काढून ते पर्यावरणाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रोहित मेहरा लुधियानात आयकर विभागात अधिकारी आहेत. मेहरा यांनी आपले काम चोख बजावताना पर्यावरणप्रेम कमी होऊ दिले नाही. निसर्गाशी जुळवून घेत ते काम करत राहिले. गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने वृक्षारोपण करत आहेत. वड, पिंपळ, अशोक, आवळा, कडुलिंब, पिंपळ अशी अनेक झाडे त्यांनी लावली आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे नऊ लाख झाडे लावली. मेहरा यांनी दोन हजार चौरस फूट ते आठ एकर जागेत हरितपट्टे साकारले आहेत. वृक्ष आयुर्वेद या प्राचीन संकल्पनेवर त्यांनी वृक्ष लागवड केली आहे. सूरत, वडोदरा, लुधियाना, अमृतसर, कोलकाता अशा शहरांमध्ये मायक्रो जंगले उभारली आहेत. झाडे लावणे हा माझा छंद तर निसर्गाची सेवा करणे कर्तव्य मानतो, असे मेहरा सांगतात. या कामात त्यांना कुटुंबियांसमवेत टीमचे सदस्यही मदत करतात. पुढच्या पिढय़ांसाठी शाश्वत पर्यावरण तयार करण्यासाठी झाडे लावावी, असे आवाहन मेहरा यांनी केले आहे.



























































