सीएसएमटी येथे प्रवाशांचे लगेज सॅनिटाईज करण्याची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सोबतच्या बॅगा तसेच अन्य लगेज सॅनिटाईज करण्याची तसेच त्यांचे पॅकिंग करण्याची सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना काही शुल्क भरावे लागणार असून लवकरच ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण आणि पनवेल येथेही सुरू होणार आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवासादरम्यान कोरोना व्हायरससह सर्व प्रकारच्या विषाणू आणि जीवाणूपासून सुरक्षित करण्यासाठी प्रवाशांसोबत असलेल्या सामानाची सॅनिटायझिंग तसेच रॅपिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही सुविधा प्रवाशांसाठी खूप आवश्यक असून स्वस्तात पुरविली जात आहे. बॅगेजच्या आकारावर सॅनिटाईज करण्याचे शुल्क ठरविण्यात येणार आहे. तसेच रॅपिंग करण्यासाठी 60, 70 आणि 80 रुपये आकारण्यात येणार आहेत. सध्या सीएसएमटीपुरती ही सुविधा मर्यादित असली तरी नंतर मध्य रेल्वेच्या सर्व लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेमुळे प्रतिवर्षी सुमारे 38.40 लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळणार आहे.

मध्य रेल्वेने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक अभिनव योजना राबविल्या आहेत. त्यात पुणे डिव्हीजनवर प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठी ‘कॅप्टन अर्जुन’ ही रोबोटीक गाडी तयार करण्यात आली होती. तसेच नागपूर डिव्हीजनमध्ये स्वयंचलित तिकीट तपासणी आणि प्रवेश देणारी ‘आत्मा’ ही प्रणाली विकसित करण्यात आली होती.

मुंबई डिव्हीजनने बॉडी स्क्रिनिंग (फ्रेब्रीआय) आणि रक्षक चिकित्सा सहायक मेडिकल रोव्हर ‘जीवक’ आणि ‘रक्षक’ तयार करण्यात आला होता. सोलापूर डिव्हीजननेही चिकित्सा सहायक रोबोट तयार केला होता.

mumbai, railway-passengers, sanitizer, corona-virus