
सामना ऑनलाईन, मुंबई
एरव्ही मुंबईच्या धावपळीत नेहमीची लोकल पकडण्याच्या घाईगडबडीत असलेले मुंबईकर प्रसंगी स्वतःच्या जिवावर उदार होऊन प्रवाशांचे प्राण वाचवत असतात. अशा प्रकारे संकटात सापडलेल्या मुंबईकरांसाठी ‘देवदूत’ म्हणून पुढे आलेल्या मुंबईकरांना एम इंडिकेटर अॅपने ‘रेल हीरो 2018’ या पुरस्काराने सोमवारी सन्मानित केले. त्यात रेल्वेचे कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान यांच्याबरोबरच सामान्य प्रवासीदेखील असून अशा जवळपास 34 जणांना सन्मानपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकल प्रवासात स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचविणारे अनेक अनामिक प्रसिद्धीपासून दूर राहतात. अशांचा गौरव करून त्यांच्यासारखे कार्य करण्याची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून एम इंडिकेटर या मोबाईल अॅपचे प्रमुख सचिन टेके यांनी यंदाच्या वर्षापासून हे पुरस्कार सुरू केले आहेत.
पश्चिम रेल्वे आरपीएफचे उपमहानिरीक्षक, मुख्य सुरक्षा आयुक्त डी. बी. कासार, उपमुख्य सुरक्षा आयुक्त भावप्रीता सोनी तसेच मध्य रेल्वेचे इन्स्पेक्टर रामपाल बरपग्गा यांच्या हस्ते यावेळी ‘रेल हीरो 2018’ पुरस्काराने प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या देवदूतांचा गौरव करण्यात आला. यावेळी आरपीएफचे मुकेश यादव, वीरेंद्र यादव, एस. टी. बिराजदार, संदीप यादव, उत्तम गौतम, सुनील नापा, घनश्याम शिंदे, सोनाली पवार, बलविंदर दयाराम, अमित पहल, मोनू मेहरा, शोएब शेख, सचिन पोळे, विनोद शिंदे, राज कमल, अरुण कुमार, जे. पी. एस. यादव, जावेद शेख, विनीत कुमार, संतोष पाटील, अशोक यादव, उदय मसूरकर, रमेश चौधरी, विनीत सिंग, महादेव पावणे, रेल्वेचे कर्मचारी आर. के. मीना, गणेश वाडके, चंद्रशेखर सावंत, शशिकांत चव्हाण आदींचा गौरव करण्यात आला.
अॅपवरच तरुणीला वाचविणाऱ्यास शोधले…
विक्रोळी आणि घाटकोपरदरम्यानच्या एका तरुणीला वाचविणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीचा व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दारात लटकणारी ही तरुणी जवळपास कोसळण्याच्या बेतात असताना इश्तेखर अहमद यांनी खाली वाकून तिला वाचविले होते. त्यानंतर अहमद यांचा कोणीच शोध घेतला नाही.
त्यास सचिन टेके यांनीच अॅपच्या माध्यमातून शोधून काढले. या अहमद यांच्या कर्तृत्वामुळेच आपल्याला असा पुरस्कार का सुरू करू नये, अशी कल्पना सुचल्याचे टेके यांनी सांगितले. इश्तेखर यांच्याप्रमाणेच वांद्रय़ाला ट्रकवर पडलेल्या गर्भवती महिलेला वाचविणाऱ्या प्रेरणा शाह आणि जीआरपी कॉन्स्टेबल रूपाली मेजारी, गाडीतून ट्रकवर पडलेल्या जखमी प्रवाशाला पाहून चर्नी रोडवर उतरून मदत पोहोचविण्यास मदत करणारे श्रवण तिवारी अशा देवदूतांना पाच हजार रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.





























































