
द्वारकानाथ संझगिरी <<[email protected]>>
आज सकाळचा सूर्य अशुभ बातमी घेऊन आला. ‘माधवराव आपटे गेले.’ पण माझा या बातमीवर विश्वास बसत नाहीय. स्मशानात जाऊन त्यांच्या पार्थिव शरीराचं मी दर्शन घेऊन आलोय. तरीही माझं मन या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नाही.
काही माणसं आपल्यातून गेल्यावरही ती आपल्यात असल्याचा भास होतो. अजित वाडेकर पुढल्या क्षणी भेटेल असं मला अजूनही वाटतं. माधवरावांबद्दही मला तसंच वाटत राहील. मी त्यांना फोन करून म्हणेन, ‘‘माधवराव अमूकतमूक कार्यक्रम आहे. तुम्हाला यायचंय.’’ ते म्हणतील, ‘‘थांब, डायरी पाहून सांगतो.’’ आणि मग पुढच्याच क्षणी म्हणतील, ‘‘येतो. सातचा कार्यक्रम ना? पावणेसातला येतो.’’ आणि मग पावणेसातला उत्तम निवडलेल्या कपडय़ांत देवानंद किंवा अशोककुमारला हेवा वाटावा असं स्मितहास्य चेहऱयावर ठेवून ते भेटतील.
माधवराव बरंच काही होते. ते उत्तम क्रिकेटपटू होते. ते यशस्वी बिझनेसमन होते. ते मुंबईचे शेरीफ होते. वगैरे वगैरे! पण त्यापेक्षा महत्त्वाचं, ते उत्तम माणूस होते. त्यांना भेटल्यावर प्रसन्न वाटायचं आणि तिथल्या तिथे आनंद व्हायचा. माझ्या एका कार्यक्रमात मी रंगमंचावर त्यांचं स्वागत करताना म्हटलं होतं, ‘‘आम्हाला लहानपणी शिकवलं होतं की, ‘श्रीमंती लुळीपांगळी असते आणि गरिबी हट्टीकट्टी!’ माधवरावांकडे पाहिल्यावर ही एक अंधश्रद्धा आहे हे पटलं. श्रीमंती नुसती हट्टीकट्टी नसते, तर तिला अहंकार नसतो. ती अदबशीर असते. ती विनयशील असते, ती प्रसन्न असते हे जाणवलं. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असतील, तर माधवराव हे हसरं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे.
त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना मी कधी पाहिलं नव्हतं. एखाद्दोनदा रणजी ट्रॉफीमध्ये पाहिल्याचं स्मरतं. पण त्यांच्या साठीच्या जवानीत, पांढऱया शुभ्र कपडय़ांत मी त्यांना कांगा लीग खेळताना पाहिलंय. त्या वेळी कांगा लीग पाहणे हे व्यसन होतं. त्या व्यसनातील नशाच काही खेळाडूंबरोबर संपली. पण त्यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाकडे नुसती नजर टाकली तरी त्यांचं मोठेपण जाणवतं. ते फक्त सात कसोटी सामने खेळले आणि त्यांनी त्यात 49.3च्या सरासरीने 542 धावा केल्या. त्यात ते पाच कसोटी सामने 1953 साली वेस्ट इंडीजमध्ये खेळले. तिथे त्यांनी 3 अर्धशतकं आणि एक 163 धावांचं प्रदीर्घ शतक ठोकलं. त्या शतकाची कथा त्यांनी मला एकदा सांगितली होती. ते 99वर असताना शतकाकडे जायला अधीर झाले होते. कुणीही होईल. पहिलंवहिलं कसोटी शतक होतं ते! त्या अधीर मनःस्थितीत ते एक-दोन चुकीचे फटके खेळले. त्या वेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सर फ्रॅन्क वॉरेलने त्यांना सांगितलं, ‘‘घाई करू नकोस. तुझं शतक होणार. योग्य चेंडूची वाट पहा.’’ आजच्या पिढीचा या गोष्टींवर विश्वास बसणार नाही. एक प्रतिस्पर्धी खेळाडू शतकाच्या उंबरठय़ावरच्या खेळाडूचा पाणउतारा करून त्याच मनोधैर्य खचलं जाईल याचा प्रयत्न करण्याऐवजी चक्क धीर देतो? पण त्या वेळी क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ होता. एका सभ्य खेळाडूने दुसऱया सभ्य खेळाडूला दिलेला तो प्रेमाचा सल्ला होता. देशाच्या सीमांपेक्षा सभ्यतेच्या सीमा त्या वेळी जास्त पवित्र मानल्या जायच्या.
या इतक्या मोठय़ा पराक्रमानंतर हा गुणवान क्रिकेटपटू फक्त एकच कसोटी सामना खेळावा का? त्यांनी पोपटवाडी संघाविरुद्ध धावा केलेल्या नव्हत्या. फ्रँक किंग, गेरी गोमेझ, वॉरेल व्हॅलेनटाईन, रामाधीनविरुद्ध केलेल्या होत्या. तीन वर्षे आधी, व्हॅलेण्टाईन, रामधीनने साक्षात इंग्लंडला इंग्लंडमध्ये लोळवलं होतं. त्याचं कारण त्या काळातली क्रिकेटमधली काही मंडळीची दादागिरी! त्या वेळी क्रिकेटपटूंच्या करीअरचा जमाखर्च निवड समिती आणि त्या निवड समितीचे अध्यक्ष करीत. धावा, विकेट्स या दुय्यम होत्या. लाला अमरनाथ त्या वेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. माधवरावांच्या वडिलांकडे कोहिनूर मिलची देशव्यापी एजन्सी होती. लाला अमरनाथच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी माधवरावांच्या वडिलांकडे दिल्लीची एजन्सी मागितली. माधवरावांच्या वडिलांनी नकार दिला. लाला अमरनाथने माधवरावांच्या कारकिर्दीवरच कुऱहाड चालवली. आज हे अविश्वसनीय वाटतं. पण त्या वेळी हे घडायचं. त्या काळी एकदा निवड समितीचा अध्यक्ष दत्ता रे नावाचा फुटबॉलपटू होता. तो म्हणे काही वेळा विकेट पडली की गोल म्हणून ओरडायचा. आजचे हिंदुस्थानी क्रिकेटचे प्रशासकीय दादा बरेच सुसंस्कृत आहेत. त्या वेळी ‘जंगलराज’ होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीही कुणाची शिकार करायचं.
पण सद्गृहस्थ असलेल्या माधवरावांनी ही गोष्ट अनेक वर्षे मनातच ठेवली. 1954नंतर कसोटी क्रिकेट न खेळताही ते त्यांच्या वयाच्या 71व्या वर्षापर्यंत कांगा लीग क्रिकेट खेळत होते.कारण क्रिकेट हा त्यांचा श्वास होता. बऱयाचदा बिझनेससाठी सिंगापूरला असताना ते रविवारी कांगा लीग खेळायला येत आणि दुसऱया दिवशी परत जात. त्यांच्या आनंदाबरोबर इतरांना मिळणाऱया अनुभवाचा विचार कराना क्रिकेटचा ज्ञानकोश, वय वगैरे विसरून त्यांच्या मुलाच्या आणि काही वेळा नातवाच्या वयाच्या मुलांबरोबर पांढऱया कपडय़ात मिसळायचा. मला एक सचिनचा किस्सा आठवतोय. कुठल्याशा क्लब मॅचमध्ये सचिन फलंदाजी करीत होता. स्लीपमध्ये माधवराव होते. खेळपट्टीवर चेंडू वळत होता. सचिन एकदोनदा पुढे जाऊन खेळला. माधवरावांनी त्याला समजावलं, खेळपट्टी फिरतेय. जास्त सावधपणे खेळलं पाहिजे. सचिन हो म्हणाला. पुढच्याच एका षटकात त्याने समोरच्या ऑफस्पिनरला पुढे सरसावत शिवाजी पार्कच्या खेळपट्टीवरून रस्त्यावर फेकून दिलं. सचिनच्या पाठीवर पहिली कौतुकाची थाप त्यांची होती. ताबडतोब त्यांनी सचिनला सीसीआय (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया)ची मेंबरशिप दिली. सचिनची गुणवत्ता ही सामान्य मुलाची नाही. त्याच्या लाडक्या पिटर मे, कॉम्पटन, वॉरेल, सोबर्सच्या तोडीची आहे हे त्यांना तिथे पटकन समजलं.
त्यांच्या तोंडून त्यांच्या काळाच्या क्रिकेटपटूंचे किस्से ऐकणं हा वेगळाच अनुभव होता. फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या असामान्य गुणवत्तेच्या प्रेमात ते पडत. त्यावरचं त्यांचं भाष्य हा सौंदर्यानुभव असे. त्यांचे जगभर मित्र होते. त्यांच्या त्या आलिशान वुडलॅण्डमधल्या काही मैफिलीत मीसुद्धा होतो. ते आदरातिथ्य आणि तो गप्पांचा फड याला तोड नाही.
सुभाष गुप्तेंच्या बायकोचं कन्यादान त्यांनी कसं केलं होतं इथपासून वॉरेल, सोबर्स, विनू मंकड, हजारेंच्या रम्य कथा ऐकणं आणि ऐकता ऐकता स्कॉच घेणं या अनुभवाला आम्ही कायमचे मुकलो. त्यावर माझा खरंच विश्वास बसत नाहीय. सोबर्सने अंजू महेंद्रूच्या बोटात वाड्ःनिश्चयाची अंगठी घातली त्या घरातल्या मैफिली संपल्या हे कठीण आहे पचवणं. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक मित्र अमेरिकेतून आला. त्याला माधवरावांच्या वूडलॅण्डच्या गच्चीवरून मुंबईचे फोटो घ्यायचे होते. मी फक्त एक फोन केला. माधवराव ‘या’ म्हणाले. त्या गच्चीचे कठीण जिने ते आमच्यापेक्षा वेगात चढले तेव्हा आम्ही दोघेही त्यांना म्हणाले, ‘‘केवढे फिट आहात तुम्ही. तरुणासारखे जिने चढताय.’’आज मला वाटलं, आमची दृष्ट तर लागली नाही ना त्यांना? लहानपणापासून मनाच्या देव्हाऱयात मी अनेक देवांची प्रतिष्ठापना केली होती. त्यातले एकामागून एक देव अंतर्धान पावतायत. आज एक हसरा खेळकर, कधीही न कोपणारा देव अंतर्धान पावला.



























































