
>>माधव डोळे
शहरांचा चेहरामोहरा बदलू लागला की, जुनी अस्तित्वं गळून पडतात. या बदलत्या शहरांच्या जुन्या खुणा केवळ विस्मृतीत उरतात. नुकताच कल्याण शहरातील पत्री पूल पाडण्यात आला. आपलं अस्तित्व आता केवळ भूतकाळातच उरणार आहे हे जाणणाऱ्या या पुलाचं हे काल्पनिक मनोगत.
अरे, तू कुठे आहेस? मी पत्रीपुलावर अडकलोय… हे शब्द आता कधीच ऐकायला येणार नाहीत. कारण माझं अस्तित्व नष्ट झालंय. असं असलं तरी मला कोण विसरेल? आज कल्याण शहराचा चेहरामोहरा बदललाय. या शहराला शतकाहून अधिक कालखंड मी जवळून अनुभवला आहे. तुम्ही म्हणाल, नावात काय आहे? पण पत्रीपूल हा शब्द कल्याण व परिसरातील लाखो लोकांच्या केवळ मुखात नाही तर त्यांच्या हृदयात बसला आहे. खरं सांगू? माझं अस्तित्व आता नसलं तरी कल्याणकराच्या मनात माझं स्थान पोलादाप्रमाणे भक्कम आहे. 1914 चं साल मला अजूनही आठवतंय. खरं तर ब्रिटिशांनी माझ्यावर उपकारच केले. कारण 16 एप्रिल 1853 या दिवशी बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान हिंदुस्थानातील पहिली रेल्वे धावली. रेल्वे कसली… तो तर चाक्या म्हसोबा! हाच म्हसोबा दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1954 ला कल्याणमध्येही आला. इंग्रज म्हणाले होते, ‘ही रेल्वे तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी आहे.’ पण काळ बदलला आणि रेल्वेचा प्रवास सर्वांसाठी खुला झाला.
1914 साल उजाडलं तेव्हा माझा जन्म झाला. कल्याणच्या निसर्गरम्य खाडीच्या जवळून रेल्वेमार्ग टाकला होता. कचोरे गावाला लागून असलेला भूईडोंगरीचा परिसर म्हणजे हवीहवीशी वाटणारी हिरवाई. थंडगार वारे आणि शांततादेखील. कल्याणची त्यावेळची लोकसंख्या होती 11 हजार 386. तेव्हा घोडे, बैलगाडी हेच प्रवासाचं मुख्य साधन होतं. वस्ती तर अतिशय विरळ. कल्याण पूर्वेहून पश्चिमेकडे जाण्यासाठी रूळ ओलांडावा लागायचा. पहिलं महायुद्ध नुकतंच सुरू झालेलं. कल्याणमध्ये रेल्वे सुरू झाल्याने नेतीवली डोंगरासमोर असलेले रूळ ओलांडून अनेकजण ये-जा करायचे. तेथे एखादा पूल बांधावा अशी कल्पना पुढे आली आणि माझा जन्म झाला. त्यासाठी लागणारे लोखंड खास इंग्लंडहून समुद्रमार्गे आणलं होतं. जीआयपीआर म्हणजे ‘ग्रेट इंडियन पॅनन्सुला रेल्वे’ने हे कंत्राट एका कंपनीला दिलं होतं. 120 टन वजन असल्यानं पूल उभारणं हे मोठं आव्हान होतं. आजच्यासारखी साधनसामग्रीही नव्हती. तरीदेखील कुशल अभियंत्यांनी मला आकारउकार दिला आणि पूल सुरू झाला. या पुलाच्या उभारणीत फक्त पोलाद वापरलं. पत्र्याचा भक्कमपणा आणि पोलादी कणखरपणा यामुळे लोकांनीच माझं बारसं केलं आणि नाव ठेवलं ‘पत्रीपूल.’
माझा जन्म होण्यापूर्वीदेखील या मार्गाला खूप महत्त्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर कल्याणमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त दोन मार्ग होते. पहिला लालचौकीजवळ गांधार दरवाजा होता आणि दुसरा पत्रीपुलाजवळील पनवेल दरवाजा. आजूबाजूच्या खेड्यामध्ये पिकणारा भाजीपाला, दूध याच रस्त्याने पुढे कल्याण गावात जायचा. माझ्यापासून थोड्याच अंतरावर बैलबाजार होता. तिथे बैलांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार व्हायचा. आता हा बाजार थंडावला आणि तेथील मोकळ्या मैदानावर इमारती आल्या. तिथे आता बैल दिसत नसले तरी तो परिसर बैलबाजार या नावानेच ओळखला जातो. तुम्ही म्हणाल, या बैलबाजाराचा आणि पत्रीपुलाचा संबंध काय? पण माझ्या हयातीत अनेक घोडे, बैल आणि त्यांचं ऐश्वर्य मी जवळून पहिलयं. ही मुकी जनावरे माझ्या अंगाखांद्यावरून जायची तेव्हा त्यांच्या मनाचं गूज मला समजायचं. या बैलबाजाराबरोबरच सध्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचीही जडणघडण मी पहिलीये. तिथे सध्या फुलबाजारही भरतो. या फुलांचे आणि भाज्यांचे ट्रक पत्रीपुलावरूनच जायचे. सायकलीपासून ते अगदी महाकाय वजनाची मोठी वाहने सुरक्षितपणे गेली आहेत. अनेकांचे भार मी सहन केलेत. कल्याण छोटं गाव होतं तेव्हा अनेक वृद्ध मंडळी माझ्याजवळ येऊन आपलं मन मोकळं करायची. 26 जुलै 2015 हा दिवस मी कसा विसरेन? त्या जलप्रलयावेळी अवघं कल्याण पाण्यात बुडालं होतं तेव्हा अनेकांना मीच आधार दिला.
114 वर्षांचं आयुष्य मला लाभलं. या कालखंडांत कल्याणमधील अनेक बऱ्यावाईट घटनांचा मी साक्षीदार आहे. या पत्रीपुलामुळे कल्याण आणि डोंबिवलीच नव्हे तर अनेक लहानमोठी गावे एकमेकांना जोडली गेली. बघता बघता विकास झाला आणि छोट्या गावाचं महानगरात रूपांतर झालं. टांग्यांची टपSटपS. बैलगाडीचा आवाजS. माझ्या अजूनही कानात घुमतोय. आज कल्याणची लोकसंख्या 20 लाखांवर पोहोचली. नेतीवलीच्या डोंगरावर बेकायदा घरे उभारली. या डोंगराचं हिरवं वैभव लयाला गेलं. ती अवस्था बघून वाईट वाटतं. खाडीच्या पलीकडेदेखील रेल्वे रुळाला लागून आता मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारण्यात येत आहेत. काळानुसार स्थित्यंतर होणारच. एक मात्र खरं की, मी म्हणजे पत्रीपूल, फक्त दोन शहरांना जोडणारा पूल नव्हतो तर सांस्कृतिक आणि भावनिक पूल होतो.
आता माझ्यापासून जवळच असलेल्या मोकळ्या जमिनींवर मोठ्या इमारती, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, दुकाने उभी राहिली आहेत. पत्रीपुलाचा परिसर झपाट्याने बदलतोय. शतकाचा हा बदल मी अनुभवला आहे. काळाच्या ओघात लोकसंख्या वाढली, प्रत्येकाच्या घरोघरी चारचाकी आणि दुचाकी वाहने आली. त्यामुळे ट्रफिक जाम होऊ लागले. त्याला पर्याय म्हणून माझ्याच शेजारी 2001 साली नवा काँक्रीटचा पूल बांधला. तरीही अनेकजण पत्रीपुलावरून जाणे पसंत करायचे. कारण येथून जाण्या-येणाऱ्या प्रत्येकाशी माझं नातं जुळलं होतं. अर्थात माझंही वय वाढत गेलं. मी थकलो. अखेर गेल्या आठवड्यात मोठमोठ्या आधुनिक क्रेन आणल्या. त्यांनी मला अलगद बाजूला केलं. ज्या मातीमध्ये मी 114 वर्षे भक्कमपणे उभा होतो तिथून माझं अस्तित्वच नष्ट झालं. पुनरपी जननम्… पुनरपी मरणम् हा तर काळाचा नियम. तो मलाही लागू होतो. आता लवकरच मला भंगारात काढण्यात येईल. माझं उरलंसुरलं अस्तित्वही नष्ट होईल. माझ्या जागी नवा पूल उभा राहील, पण माझं नाव कल्याणकरांच्या स्मृतीतून कधीच जाणार नाही.





























































